सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहवरील लोकप्रिय 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून बाहेर पडली. तेजश्री मालिकेत 'मुक्ता' ही मुख्य भूमिका साकारत होती. तेजश्रीच्या मालिकेतून अचानक एक्झिटने सर्वांना धक्काच बसला. आजपर्यंत तिने याचं कारण सांगितलेलं नाही. वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी नुकतीच याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
सतीश राजवाडे बऱ्याच काळापासून स्टार प्रवाह वाहिनीचे बिझनेस हेड आहेत. अनेक गाजलेल्या मालिका त्यांनी चॅनलच्या माध्यमातून दिल्या आहेत.'तारांगण'युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडे यांनी तेजश्री प्रधानच्या मालिकेतील एक्झिटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "तेजश्री ही खूप अप्रतिम कलाकार आहे. खूप जुनी मैत्रीण आहे. प्रत्येकाचे स्वत:चे काही कारणं असू शकतात. आम्ही सगळे एकदम प्रोफेशनल आहोत. पुढे कधीतरी संधी मिळाली तर एकत्र काम करुच. तिच्या एक्झिटचं नेमकं काय कारण आहे याची मलाही कल्पना नाही. मला कळलं तर मी सांगेनच."
ते पुढे म्हणाले, "आम्ही रसिक प्रेक्षकांच्या मानसिकतेचा १०० टक्के विचार करतो. म्हणूनच त्यांचं एवढं प्रेम मिळत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. नवीन काहीतरी आणण्याचा आणि सशक्त करमणूक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. "
एकंदर तेजश्री मालिकेतून बाहेर का पडली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. याचं ठोस कारण अद्याप कोणीही दिलेलं नाही. अनेक प्रेक्षकांनी नव्या मुक्ताला स्वीकारलं आहे. तर काही जण अजूनही तेजश्रीचीच आठवण काढत आहेत.