सातव्या मुलीची सातवी मुलगी हि मालिका सध्या उत्कांवर्धक वळणावर आली आहेत. रोज नवे ट्विस्ट या मालिकेत घडत असतात. पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर राजाध्यक्ष कुटुंब इंद्राणीला बेघर होऊ देत नाही. तिला घरातच राहू दिलं जातं. पण इंद्राणीला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, अशाच एक दिवशी व्दिधा मनस्थितीत असताना इंद्राणीला साधू भेटतात, जे तिला लहानपणीही भेटले होते. ते तिला सांगतात त्रिनयना देवीने तुझ्यावर नेत्राला वाचवण्याची जबाबदारी सोपवली आहे.
या मालिकेत प्रेक्षकांनी हे पाहिलं की आपल्या वरदानाचा उपयोग करून नेत्राने अव्दैतचा मृत्यूयोग टाळला आहे. परंतु त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या स्त्रियांसाठी असलेले नियम नेत्राने मोडले आहेत. एके दिवशी नेत्राच्या नाकातून रक्त येऊ लागतं. आता कदाचित पुढील मृत्यू नेत्राचाच होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इंद्राणी नेत्राला सांगते की त्रिनयना देवी ग्रंथ वाचला तर काहीतरी मार्ग सापडेल. पण त्याचवेळी भालबा येऊन सांगतात, की त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा मंदिरात ठेवला तर नेत्राचा मृत्यूयोग कदाचित टळू शकतो. भालबा नेत्राला सूचना देतात की ग्रंथ मंदिरात ठेवण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पानावर हळदीकुंकू लाव आणि देवीचा मंत्र म्हण.
भालबांनी सांगितल्याप्रमाणे नेत्रा ग्रंथाला हळदीकुंकू लावत असताना ग्रंथावर तिच्या डोळ्यातील अश्रू पडतात. आणि त्यातून पंचपिटिका हा शब्द उमटतो. त्याच पानाला पुन्हा कुंकू आणि पाणी लावल्यावर एक श्लोक मोडी लिपिमध्ये लिहिलेला दिसतो. काय असेल हे पंचपिटिका रहस्य, त्याचा शोध नेत्रा कसा घेणार हे पहाणं उत्सुकतेचे ठरणार आहे.