पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर एका पबमधील अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर संबंधित पबवर कारवाई करण्यात आली होती. तो पब अनधिकृत असल्याचंही समोर आलं होतं. या दोन्ही प्रकरणांनंतर राज्यातील ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आणि प्रशासनाला राज्यातील अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर पब्ज आणि बारवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
अनधिकृत बांधकामे आणि अमली पदार्थविरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा, बुलडोझर चालवताना कोणालाही सूट देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. यानंतर राज्यातील अनेक पब्ज आणि बारवर महापालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. याबाबत आता मराठी अभिनेता सौरभ गोखलेने एक पोस्ट शेअर केली आहे. सौरभने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत एक सवाल उपस्थित केला आहे.
"शहरातील अनेक बेकायदेशीर पब्स आणि बार्सवर महापालिकेची कारवाई!! पण, हे अनधिकृत बार आणि पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिले त्या जांदूगारांचा कौतुक सोहळा कधी", अशी मार्मिक पोस्ट सौरभने केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, सौरभ हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'राधा ही बावरी' या मालिकेतून तो प्रसिद्धीझोतात आला होता. 'उंच माझा झोका' मालिकेतही तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. 'सर्कस', 'सिंबा' या रोहित शेट्टीच्या सिनेमांतही तो झळकला आहे.