Join us

सविता मालपेकरांना मालिकेदरम्यान चॅनेल हेडनेच दिला होता त्रास, म्हणाल्या - "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 4:13 PM

Savita Malpekar : सविता मालपेकर यांना मालिकेत काम करत असताना सेटवर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल नुकतेच त्यांनी सांगितले.

सिनेइंडस्ट्रीसाठी कास्टिंग काऊच हा शब्द तसा नवीन नाही. बॉलिवूड प्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या अभिनेत्रींना वाईट अनुभव आला आहे. काहींनी याबद्दल उघडपणे सांगितले आहे तर काहींनी मौन बाळगले आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनाही याचा अनुभव आला आहे. अभिनेत्री सविता मालपेकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण केली. सध्या त्या कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत एका लोकप्रिय मालिकेच्या सेटवर चॅनेल हेडने खूप त्रास दिला होता याबद्दलचा खुलासा केला आहे.

सविता मालपेकर यांना मालिकेत काम करत असताना सेटवर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल नुकतेच त्यांनी सांगितले. त्यांनी अमृता फिल्म या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, लक्ष्मी वर्सेस सरस्वती या मालिकेदरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. ही मालिका कोळ्यांवर आधारीत होती. त्यासाठी मी कोळी भाषा शिकायला खूप मेहनत घेतली होती. ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरली होती. माझी भूमिका खूप हिट झाली होती. पण त्यावेळेच्या स्टार प्रवाहच्या प्रमुखने मला खूप त्रास दिला. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये कोणीही कुठल्याही चॅनेल हेडने आणि निर्मात्यांनी इतका त्रास दिला नव्हता तितका त्रास मला त्या हेडने दिला होता. 

अंतर्वस्त्र दिसतील एवढ्या...त्या पुढे म्हणाल्या की, सांगायला काही हरकत नाही. मी कोणाला घाबरत नाही. आतमधले अंतर्वस्त्र दिसतील एवढ्या पातळ साड्या मला नेसायला दिल्या. इथूनपासून त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली होती. प्रत्येक वेळेला म्हणायचे, आमच्यामुळे तुम्ही आहात. अरे असे कोणी नसते कोणामुळे. सारखा येऊन अपमान करायचे. कुठल्या चॅनेलवर काम करताय माहितीये का? आम्ही आहोत म्हणून वगैरे. पण सुरुवातीला ऐकून घेतलं. किती सहन करणार. एक मर्यादा असते सहन करायची. 

ही घटना आहे २०१३ची

मी जाडी असल्यामुळे १८ वार साडी नेसायचे. कोळीन मला दररोज साडी नेसवायला यायची. पण मी महिन्याभर नेसवून घेतली, त्यानंतर मी स्वतः शिकले. प्रोडक्शनचे पैसे वाचू दे म्हणून. त्यावेळेस ती कोळीन दिवसाचे सहाशे रुपये घ्यायची. मग मी ते शिकले आणि नेसायला लागले. नंतर माझी सहायक अभिनेत्री माझ्या साड्याचे त्या हेडला फोटो पाठवू लागली. अशाप्रकारे मला त्रास देऊन त्या हेडला काय आनंद मिळत होता, हे आजतागायत कळले नाही. मला आव्हान केले होते की तुला आम्ही मालिकेतून काढून टाकलं तर कोणी इंडस्ट्रीत घेणार नाही. तेव्हा मी म्हटले कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुम्ही असं म्हणून मला काम मिळणार नाही, हे तर शक्य होणार नाही. आज तुम्ही बघताय मी कुठल्या स्टेजला आहे. ही २०१३ची घटना सांगतेय, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.