सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एकता कपूरला तिच्या वेब सीरिज XXX मधील आक्षेपार्ह सीनसाठी फटकारले आहे. चित्रपट निर्माती आणि टीव्ही क्वीन एकता कपूरने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला चांगलंच धारेवर धरलं. तुम्ही देशातील तरुण पिढीचे विचार दूषित करत आहात अशा शब्दांत कानउघडणी केली.
एकताने घेतली होती सर्वोच्च न्यायालयात धावओटीटी प्लॅटफॉर्मवरील ऑल्ट बालाजीच्या XXX वेब सिरीजमधील आक्षेपार्ह सीन विरोधात ६ जून २०२० ला माजी सैनिक शंभू कुमार यांनी सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली होती. बेगुसरायचे न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयाने वॉरंट काढला होता त्यानंतर एकता कपूरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, “काही तरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मन कलुषित करत आहात. OTT हा प्लॅटफॉर्म सगळ्यांना उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणते पर्याय देत आहात? उलट तरुण पिढीचे विचार दूषित करत आहात.
मुकुल रोहतगींनी मांडली एकताची बाजू त्यावर एकता कपूरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण या प्रकरणी तिथे लवकर सुनावणी होईल की नाही याबद्दल शंका आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात एकता कपूर यांना संरक्षण दिले होते. ही वेबसीरिज एका ठराविक विषयावर आधारित आहे आणि या देशात आपल्या आवडीनुसार पाहण्याचे स्वातंत्र्य आहे.
कोर्टानं सुनावलंयावर कोर्टाने म्हटलं की, तुम्ही लोकांना नेमके कोणत्या प्रकारचे पर्याय देता? तुम्ही प्रत्येक वेळी कोर्टात येता, याचे काही आम्ही कौतुक करत नाही. अशा पद्धतीच्या याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करु. कोर्टानं म्हटलं की, रोहतगी कृपया हे तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही एक चांगला वकील घेऊ शकता. हे न्यायालय आवाज नसलेल्यांसाठी काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर विचार करा सामान्य माणसाची अवस्था काय असेल, असं कोर्टानं म्हटलं.
काय आहे प्रकरणएकता कपूरच्या ट्रिपल एक्स वेबसीरीजच्या सिझन २ मध्ये सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह सीन दाखविण्यात आले होते. सैन्याचे जवान जेव्हा देशसेवेत असतात तेव्हा त्यांच्या पत्नी घरात परपुरुषांसोबत असतात, असे दाखविण्यात आले आहे. यावरुन माजी सैनिकांच्या वतीने न्यायालयात तक्रार पत्र दाखल करून आक्षेप घेण्यात आला होता.