एपिक चॅनेलवरील 'लॉस्ट रेसिपीज' या लोकप्रिय मेजवानी शोच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे. प्रख्यात लेखक आणि सेलिब्रिटी शेफ आदित्य बाल ह्या पर्वासाठी देशभरात दौरा करीत कालांतराने विसरलेल्या वेगवेगळ्या पाककलांना पुन्हा एकदा नव्याने उजाळा देणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांकरीता एपिक चॅनेलवर जून २०१९ मध्ये प्रसारित होणार आहे.
'लॉस्ट रेसिपीज'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दहा एपिसोड पाहायला मिळणार आहेत. यावेळेस हंपी, विझाग, दार्जिलिंग, बोधगया व महाराष्ट्र या ठिकाणच्या वेगवेगळ्या पाककला पाहायला मिळणार आहे. याबाबत आदित्य बालने सांगितले की,' पहिल्या सीझनचा अनुभव अप्रतिम होता. त्यावेळी वेगवेगळ्या चविष्ट पाककला पाहिल्या होत्या. एक शेफ म्हणून मला नेहमीच वाटते की इतिहास व पारंपारिक पदार्थ जास्त इंटरेस्टिंग असतात. सीझन २मध्ये देखील वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतील.'एपिक वाहिनीवर वेगवेगळे आणि प्रभावी फूड शोज आहेत. 'त्यौहार की थाली' हा फूड शो आहे, ज्याचे सूत्रसंचालन साक्षी तंवर करते. या शोमध्ये भारतात सणांमध्ये बनणाऱ्या पदार्थांची रेसिपी दाखवण्यात येते. 'राजा रसोई और अन्य कहानियां' या फुड ट्रॅव्हेल शोमध्ये सेलिब्रेटी शेफ रणवीर ब्रार वेगवेगळे व चविष्ट पदार्थ दाखवतो.