मालिकेत काम करत असताना कलाकारांना दिवसातील कित्येक तास चित्रीकरण करावे लागते. पण तरीही वेळात वेळ काढून ते आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात. कलाकार डाएट आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींना आवर्जून महत्त्व देतात.
झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे संभाजीराजांच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनयातून या मालिकेतील भूमिकेद्वारे प्रेक्षकांमध्ये जबरदस्त छाप पाडली आहे. ऐतिहासिक भूमिकांवर आपला ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हे यांचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. अमोल कोल्हे नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत ते आपल्याला जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत.
अमोल कोल्हे सध्या त्यांच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यासोबत त्यांनी नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. अभिनय आणि राजकारण या दोन्ही गोष्टीत अमोल कोल्हे व्यग्र असले तरी ते त्यांच्या फिटनेसकडे देखील तेवढेच लक्ष देतात. ते त्यांच्या फिटनेसबाबत किती सतर्क आहेत हे आपल्याला त्यांनी इन्स्टाग्रामला शेअर केलेल्या व्हिडिओमधून लगेचच लक्षात येत आहे.
अमोल कोल्हे यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मोठ्या संख्येने त्याच्या फॅन्सनी या फोटोला लाईक केले आहे. तसेच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही खूपच मेहनती आहात, तुमच्याकडून प्रत्येकाने शिकले पाहिजे अशाप्रकारच्या प्रतिक्रिया त्यांचे चाहते सोशल मीडियाद्वारे देत आहेत.
'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.