Join us

मालिका हिट होणे अथवा फ्लॉप होणे हे कलाकाराच्या हातात नसतेः गौरव खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2017 12:22 PM

प्रेम या पहेली चंद्रकांता या मालिकेत गौरव खन्ना प्रमुख भूमिकेत झळकत आहे. त्याने याआधी कुमकुम, भाभी, मेरी डोली तेरे ...

प्रेम या पहेली चंद्रकांता या मालिकेत गौरव खन्ना प्रमुख भूमिकेत झळकत आहे. त्याने याआधी कुमकुम, भाभी, मेरी डोली तेरे अंगना यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण पहिल्यांदाच तो एका कॉश्च्युम ड्रामामध्ये दिसत आहे. गौरव गेली 10-11 वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. पण अभिनयात येण्याचा मी कधी विचारच केला नव्हता असे तो सांगतो. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...प्रेम या पहेली चंद्रकांता या मालिकेत तू काम करणार आहेस, चंद्रकांता ही नव्वदीच्या दशकातील एक प्रसिद्ध मालिका होती. ही मालिका तू कधी पाहिली होतीस का?मला लहानपणापासून खेळण्यात जास्त रस असल्याने मी टिव्ही खूपच कमी पाहायचो. त्यामुळे ही मालिका मी कधी पाहिलेली नाही. पण माझ्या चुलत आणि मावस भावंडांकडून मी या मालिकेविषयी ऐकले आहे. प्रेम या पहेली चंद्रकांता ही मालिका स्वीकारल्यानंतर तरी मी चंद्रकांता पाहेन असे अनेकांना वाटले होते. पण अद्याप तरी मी ही मालिका पाहिलेली नाही. कारण आमची मालिका ही चंद्रकांता या मालिकेपेक्षा खूप वेगळी आहे. खूप वेगळी कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. केवळ या मालिकेतील व्यक्तिरेखा या चंद्रकांता या मालिकेप्रमाणे आहेत. मी जुनी मालिका पाहिल्यास नकळत त्याची कॉपी केली असती असे मला वाटते. त्यामुळेच मी ही मालिका मी न पाहाणेच पसंत केले आणि माझ्या टीमने माझी भूमिका मला खूपच चांगल्याप्रकारे समजून सांगितली असल्याने मी या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकलो असे मला वाटते. तू आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही मालिका खूप वेगळी आहे, त्यामुळे प्रेक्षक तुला या भूमिकेत स्वीकारतील असे तुला वाटते का?मी आतापर्यंत सगळ्या रोमँटिक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे एका चॉकलेट हिरोची माझी इमेज बनली आहे. पण या मालिकेतील माझी भूमिका ही आजवरच्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी असून मी यावर खूप मेहनत घेत आहे. मी या भूमिकेसाठी माझी शरीरयष्ठी बनवली असून सध्या घोडेस्वारी शिकत आहे. तसेच माझे डाएट सुरू आहे. माझी ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल असा मला विश्वास आहे. तुला मालिकांमध्ये रस नसताना तू या क्षेत्राकडे कसा वळलास?मी लहानपणी मालिका पाहिल्या नसल्या तरी कार्टून्स पाहात असे. टॉम अँड जेरी तर माझे फेव्हरेट कार्टून होते. कार्टून्ससाठी मी टिव्ही पाहायचो. अभिनयात मला रस नव्हता असे मी कधी म्हणणार नाही. पण माझे जास्त लक्ष हे अभ्यासात होते. पण बहुधा देवाची इच्छा काही वेगळी होती आणि त्यामुळेच मी शिकत असतानाच मला मॉडेलिंग आणि अभिनयाच्या ऑफर्स मिळाल्या आणि मी या क्षेत्राकडे वळलो.तेरे बीन ही तुझी मालिका नुकतीच संपली, या मालिकेला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. मालिका जेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत. त्यावेळी एक अभिनेता म्हणून तुला काय वाटते?अभिनय करणे हे माझे काम आहे. लोकांना माझी मालिका अथवा भूमिका आवडेलच असे मी सांगू शकत नाही. टिआरपी चांगला मिळणे हे अभिनेत्यांच्या हातातच नसते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे दुःख मी करत नाही आणि एखादी मालिका चालत नाही याचा अर्थ ती मालिका कोणालाच आवडली नव्हती असा होत नाही. काही लोक तरी ती मालिका आवडीने पाहातात आणि आम्हाला भेटल्यावर आमच्या भूमिकेचे कौतुक करतात याचे समाधान माझ्यासाठी खूप असते.