बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या ८२ व्या वर्षीही काम करत आहेत. आजही रात्री एक वाजेपर्यंत ते लोकप्रिय 'केबीसी' शोचं शूट करतात. २ वाजता घरी जातात. या वयात त्यांचा दांडगा उत्साह वाखणण्याजोगा आहे. अनेक २५ वर्षांपासून बिग बी केबीसी होस्ट करत आहेत. याच शोमुळे कर्जात बुडालेले बिग बी मालामाल झाले होते. मात्र आता हा सीझन अमिताभ बच्चन यांचा शेवटचा सीझन असेल अशी चर्चा आहे. पुढच्या सीझनमध्ये त्यांच्या जागी कोण दिसणार यासंबंधीही काही नावं समोर आली आहेत.
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी 'आता वेळ आली आहे' असं ट्वीट केलं होतं. त्यावरुन बरीच चर्चा झाली होती. नंतर त्यांनी काम संपवून घरी जायची वेळ आली असं म्हणायचं होतं असं स्पष्टीकरण दिलं होतं. केबीसीच्या १५ व्या सीझनवेळीच अमिताभ बच्चन यांनी हा आपला शेवटचा सीझन असं सांगितलं होतं. आता १७ व्या सीझनसाठी मात्र नवीन होस्टची चर्चा सुरु झाली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्सच्या रिपोर्टनुसार, केबीसीच्या पुढच्या सीझनसाठी शाहरुख खानचा (Shahrukh Khan) विचार करण्यात येत आहे. शाहरुखनने २००७ साली तिसऱ्या सीझनचं होस्टिंग केलं होतं. शाहरुखशिवाय ऐश्वर्या राय, महेंद्रसिंह धोनी यांचंही नाव समोर येत आहे. लोकप्रियता आणि प्रेक्षकांशी जवळचं नातं असलेला सेलिब्रिटी हे फॅक्टर मोठे आहेत. केबीसीचा पुढील सीझन कोण होस्ट करणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.