शाहरुख खान सांगतोय माझी मुलगी सुहानाने पूर्ण करावी माझी ही इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 7:07 AM
शाहरुख खानला फॅमिली मॅन म्हटले जाते. आज शाहरुख बॉलिवूडचा बादशहा आहे. पण तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी ...
शाहरुख खानला फॅमिली मॅन म्हटले जाते. आज शाहरुख बॉलिवूडचा बादशहा आहे. पण तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना वेळ देतो. शाहरुखला सुहाना, आर्यन आणि अब्राम अशी तीन मुले आहेत. त्याची मुलगी सुहाना तर सध्या बॉलिवूडच्या अनेक पार्टींमध्ये, कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळते. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरदेखील ती खूपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोव्हर्स आहेत. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री देखील करणार असल्याची चर्चा आहे.शाहरूख खानच्या आपल्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत, ते आजवर त्याने कधीच मीडियासमोर सांगितले नव्हते. पण ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमाच्या एका भागात त्याने त्याच्या मुलांविषयी भरभरून गप्पा मारल्या. महिलांचे सक्षमीकरण विषयावरील एका विशेष भागात तो बोलत होता. आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने सुहानाने सध्या अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.शाहरूख खानने त्याची मुलगी सुहाना खानबद्दल त्याच्या मनात असलेली एक इच्छा या कार्यक्रमात व्यक्त केली. 100 साडी पॅक्टच्या सहसंस्थापिका अंजू कदम नुकत्याच टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमात आल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत गप्पा मारताना शाहरूख म्हणाला, माझी आई जन्मभर साडीतच वावरली. ती साडीत खूपच छान दिसायची. माझी मुलगी सुहाना देखील साडीत खूप छान दिसेल याचा मला विश्वास आहे. त्यामुळे मी अंजूजी यांना विनंती करतो की, तुम्ही माझी मुलगी सुहाना हिच्याशी बोलून तिच्याकडून दहा साड्या नेसण्याचा तरी करार करून घ्या. माझ्या मुलीला साडीत पाहाण्याची माझी नक्कीच इच्छा आहे.सुहानाच्या कपड्यांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. ती नेहमीच वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळते. सुहाना अधिकाधिक वेस्टर्न कपड्यांमध्येच दिसते. पण काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबियातील एका लग्नात ती भारतीय पेहरावात दिसली होती. तिची ही स्टाइल सगळ्यांनाच आवडली होती. सुहानाने साडी नेसली तर ती त्यात छानच दिसेल असे सगळ्यांना वाटत आहे. Also Read : शाहरुख खान सांगतोय, ही अभिनेत्री दिसते साडीत अतिशय सुंदर