गेल्या १५-१६ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा ( tarak mehta ka ulta chashma). आजवर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपल्यातला वाटतो. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून ही मालिका सातत्याने चर्चेत येत आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर यातील तारक मेहता म्हणजे अभिनेता शैलेश लोढा (shailesh lodha) चर्चेत आले आहेत. पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या स्ट्रगल काळाविषयी भाष्य केलं आहे.
शैलेश लोढा यांनी नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या स्ट्रगल काळात कसे हालअपेष्टा सहन केल्या हे सांगितलं. अगदी औषध विक्रीपासून ते गमावलेली नोकरी इथपर्यंत त्याने अनेक वाईट दिवस पाहिले. "मी आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टी ठरवून केल्या नाहीत. पगार बंद झाल्यावर मला नोकरी सोडावी लागली. त्या काळी आईचा भीषण अपघात झाला होता. तिला रुग्णालयात दाखल करायचं होतं. मला दोन तरुण बहिणी होत्या त्यामुळे त्यांचं लग्न लावून द्यायचं होतं. त्याचसोबत मला NSD आणि JNU मध्ये जाऊन शिकायचं सुद्धा होतं. पण मला माझ्या सगळ्या स्वप्नांचा त्याग करुन एका फार्मास्युटिकल कंपनीत सेल्समनची नोकरी करावी लागली. हा माझा निर्णय होता", असं शैलेश लोढा म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "त्यावेळी मी प्रसिद्ध बालकवी होतो. मी लोकांना ऑटोग्राफ देत असे. मी राष्ट्रीय स्तरावरील वादविवाद स्पर्धेत चॅम्पियनदेखील होतो. पण, मी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात औषधे विकायला सुरुवात केली."
दरम्यान, शैलेश लोढा यांना तारक मेहतामध्ये परत येणार का? असा ही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मागे वळून पाहायला मला आवडत नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे या मालिकेत पुन्हा काम करायची इच्छा नसल्याचं सांगितलं. शैलेश लोढा यांनी एप्रिल २०२२ मध्ये तारक मेहता ही मालिका सोडली. तारक मेहता व्यतिरिक्त ते 'वाह वाह क्या बात है' आणि 'कॉमेडी सर्कस' सारख्या टीव्ही शोमध्येही झळकले आहेत.