Shailesh Lodha : तब्बल १४ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सर्वांना खळखळून हसवणाऱ्या या मालिकेत मात्र अंतर्गत बरेच वाद सुरु आहेत. तारक मेहताची भूमिका साकारणारेच अभिनेते शेलैश लोढा मालिका सोडून गेले आणि सर्वांना धक्काच बसला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी मालिका सोडली. याशिवाय लोढा यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले शैलेश लोढा ?
शैलेश लोढा सध्या त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमांसाठी फिरतीवर आहेत. दरम्यान हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, लोढा यांना मालिका सोडल्यापासून पैसे मिळालेले नाहीत. लोढा म्हणाले, 'गेल्या वर्षभरासापासून मी निर्मांत्यांच्या मागे मानधनासाठी तगादा लावला आहे. वर्षभरापासून मला पैसे मिळालेले नाहीत. काही लाख रुपये थकले आहेत. मात्र निर्माते असित कुमार मोदी सतत दुर्लक्ष करत आहेत.'
शैलेश लोढा यांचे निर्मात्यांसोबत काही वाद झाले आणि त्यांनी मालिका सोडली. ते म्हणाले, 'मला खूपच बेइज्जत झाल्यासारखे वाटले. मी काहीच नोटीस न देता मालिका सोडली. हे फक्त माझ्यासोबतच झालेले नाही तर नेहा मेहता(मालिकेतील अंजली मेहता) हिचेही ३० ते ४० लाख रुपये थकवले आहेत. टप्पूची भूमिका साकारणारा राज उनाडकट याच्यासोबतही हेच झाले आहे.
याआधीही तारक मेहता मधून अनेक कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. 'दिशा वकानी' उर्फ 'दयाबेन' यांनी काही वर्षांपूर्वीच मालिका सोडली. तसेच इतरही अनेक कलाकार मालिकेतून बाहेर पडले आहेत. एखाद्या कलाकाराने चित्रपट सोडला तर त्याची एवढी चर्चा होत नाही पण मालिकेतील कलाकाराने मालिका सोडल्यास त्याचे पैसे थकवले जातात. हे काही नवीन नाही. 'तारक मेहता...' सारख्या लोकप्रिय मालिकेत जर असे घडत असेल तर मनोरंजन विश्वासाठी आणि कलाकारांसाठी नक्कीच ही चिंतेची बाब आहे.