शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन २ जानेवारीपासून सुरू झाला आहे. शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनला लोकांची खूप पसंती मिळाली. शार्क टँक इंडियामध्ये लोक त्यांच्या बिझनेस आयडिया घेऊन येतात. तिथे बसलेल्या जजना ही कल्पना आवडली तर ते व्यवसायात गुंतवणूक करतात. अन्यथा लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. यावेळी अशीच एक मराठमोळ्या काकू शार्क टँक इंडियाच्या मंचावर दिसणार आहे, ज्यांचा व्यवसायाबद्दल जाणून घेऊन सर्व जजही अवाक् झाले.
शार्क टँक इंडिया हा एक शो आहे जिथे लोक त्यांच्या व्यवसायाला नवे पंख लाऊन झेप घेण्यासाठी येतात. अट एवढीच आहे की तुमची आयडियाही तशीच मोठी असली पाहिजे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये एक महिला दिसणार आहेत, ज्यांनी आपल्या बिझनेस आयडियाने उपस्थित सर्व जजना प्रभावित केले. सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. पाटील काकी असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे.
प्रोमोमध्ये, 47 वर्षीय मराठमोळ्या पाटील काकू आपल्या व्यवसायाची कल्पना घेऊन शार्क टँक इंडियाच्या जज समोर जातात. आपण केवळ 5 हजार रुपयांत घरातून स्नॅक्सचा व्यवसाय सुरू केला होता असे त्या सांगतात. यानंतर जज त्यांना तुमची एकूण विक्री काय आहे असे त्यांना विचारतात. यावर त्यांच्या मुलाने 3 कोटी रुपये असे उत्तर दिले. म्हणजे त्यांनी 5000 रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, आज त्याची उलाढाल 3 कोटी रुपये आहे. हे समजल्यानंतर शोच्या जज विनिता सिंह यांना धक्का बसल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.
डील होणार का?त्यांची बिझनेस आयडिया जाणून घेऊन त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी जज तयारही झाल्याचे यात दिसत आहे. अमन गुप्ता आणि अनुपम मित्तल यांनी त्यांना 40 लाखांच्या गुंतवणूकीची ऑफरही दिली. परंतु त्यांना एक जज नाही, तर सर्वच जजसोबत व्यवसाय करायचा आहे. यानंतर डील तर बदलणार असे जज अनुपम मित्तल बोलताना दिसत आहेत. तर ही डील होणार की नाही हे आता पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.