Shark Tank India Jugadu Kamlesh : जर तुम्ही शार्क टँक इंडिया पाहिलं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातील जुगाडू कमलेश या नावानं आलेला एक शेतकरी नक्कीच आठवत असेल. शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करताना त्रास कमी व्हावा यासाठी त्यानं हातानं ढकलत किटकनाशक फवारणारी गाडी तयार केली होती. त्याच्या या लेन्सकार्टच्या पियूष बन्सल (Lenskart Peyush Bansal) या शार्कनं गुंतवणूक केली होती. परंतु आता तुम्हाला जुगाडू कमलेश नक्की आहे तरी कुठे आणि त्याच्या व्यवसायाचं पुढे काय झालंय असा प्रश्न पडला असेल. पीयूष बन्सल यांनी यासंदर्भातील माहिती आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून दिली आहे.
तज्ज्ञ डिझायनर्सच्या मदतीनं आपण जुगाडू कमलेशनं तयार केलेल्या प्रोडक्टवर काम सुरू केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.तसंच यादरम्यान येणाऱ्या काही समस्यांबद्दलही त्यांनी माहिती देत त्यावर मात करण्याचे कसे प्रयत्न केले जात आहेत, याबद्दलही त्यांनी नमूद केलं. त्यांनी यासंदर्भातला एक फोटो शेअर केला आहे. "या दिवसांत मी ज्यांना भेटतो त्यांचा एकच प्रश्न असतो, जुगाडू कमलेशबाबत काय अपडेट आहे? जोपर्यंत आम्ही काही मिळवत नाही, तोवर कोणत्याही गोष्टींबाबत चर्चा करण्यावर मी विश्वास ठेवत नाही," असं ते म्हणाले.
"परंतु लोकांच्या आग्रहास्तव एक त्वरित अपडेट आहे. आम्ही व्यावसायिक औद्योगिक डिझायनर्सच्या टीमच्या मदतीने कार्टचे डिझाइन आणि कन्झुमर व्हॅलिडेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. डिझाईन टीमनं जुगाडू कमलेश आणि नारू यांच्यासोबत मालेगावला भेट दिली आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून विविध पिकांची माहिती घेत अभिप्रायही घेतले," असंही त्यांनी सांगितलं.
कोण आहे जुगाडू कमलेश?महाराष्ट्रातील जुगाडू कमलेशनं किटकनाशकांच्या फवारणीसाठी अनोखं प्रोडक्ट तयार केलं आहे. याच्या मदतीनं किटकनाशकाच्या फवारणीदरम्यान शेतकऱ्यांना होणारी समस्या कमी होणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. जुगाडू कमलेशच्या व्यवसायात लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी ४० टक्के इक्विटीच्या मोबदल्यात १० लाख रूपये आणि २० लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं आहे.