मराठमोळा अभिनेता शशांक केतकर नेहमी आजूबाजूच्या सामाजिक समस्या मांडताना दिसतो. रस्त्यांची दुरावस्था, कचरा, होर्डिंग्स/बॅनर्सचा त्रास याबद्दल याचे व्हिडिओ शेअर करत तो प्रशासनाला थेट तक्रार करतो. अनेकदा त्याच्या व्हिडिओंनंतर थेट कारवाईही झाली आहे. आता नुकतंच शशांकने मढ आयलंडला जातानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने या रस्त्यावर नेमका काय त्रास होतोय हे सांगितलं आहे.
शशांकने मढ आयलंडला जातानाचा व्हिडिओ कारमधून शूट केला आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला वाहतुकीचा खोळंबा आहे. नंतर त्याच्याही रांगेतली वाहतूक मंदावते. मध्येच अँब्युलन्सही अडकलेली दिसत आहे. तो म्हणतो, "महापालिका आणि सर्व राजकारणी माणसांना माझा नमस्कार. मलाच कसा ट्रॅफिकचा त्रास होतो असं प्रेक्षक म्हणतील. पण हा त्रास तुम्हालाही होतो फक्त तुम्ही गप्प राहून सहन करता आणि मी बोलून सहन करतो. मुंबईचं स्पिरिट नावाखाली आपणच आपं नुकसान करत आहे. वेळ, कष्ट वाया जातो प्रदूषण होतंय ते वेगळंच."
"फिल्ममध्ये दाखवतात ते मढ आयलंड खूप सुंदर आहे पण ते अजिबात सुंदर नाही तर ते असं आहे. असा हा रस्ता आहे. अनेक वर्ष हीच अवस्था आहे. आता तोंडदेखलं काम सुरु झालं आहे. मात्र यामुळे ट्रॅफिक वाढलीये. या सगळ्यात आम्ही प्रसन्न चेहऱ्याने शूटिंगला पोहोचतो. काही जण मला म्हणाले की राजकीय नेत्यांबद्दल फारसं बोलू नको ते डेंजर लोक आहेत. पण माझा त्यांनाच प्रश्न आहे की जर त्यांना आमच्यात इंटरेस्ट असतो आम्ही त्यांच्या कामात इंटरेस्ट घ्यायला नको का? इथे रस्त्याचं काम सुरु असतानाही इथे १२ वी चं सेंटर आलं आहे. पालक रस्त्यातच गाड्या पार्क करुन मुलांना सोडायला गेलेत. त्यामुळे इथे खोळंबा झाला आहे. हे महापालिकेचं अव्यवस्थापन आहे. हे तुम्हाला तरी पटतंय का?"
शशांकने कॅप्शनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनाही टॅग केले आहे.