अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) नेहमीच समाजात आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितींवर भाष्य करत असतो. मुंबईतील रस्ते, स्वच्छता या मुद्द्यांवरुन तर तो कायम व्यक्त होतो. अनेकदा त्याच्या तक्रारीनंतर बीएमसीने तातडीने कारवाईही केली आहे. आता पुन्हा एकदा शशांक भडकला आहे. मिरा भाईंदरमध्ये रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था त्याने दाखवली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्याने मत व्यक्त केलं आहे.
मीरा भाइंदरमध्ये असणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. ज्याचं अनावरणही झालेलं नसल्याने त्यावर लाल कापड टाकण्यात आलं आहे. त्यासमोरच रस्त्याची झालेली ही बिकट अवस्था काळजीत पाडणारी आहे. शशांक म्हणाला, "मी पोस्ट केलेला हा फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. जन्माष्टमीच्या निमित्ताने मला हा व्हिडिओ मुद्दाम टाकावा वाटतोय. आपल्या देशात एकंदरीतच जे काय निर्लज्ज राजकारण होत आलं आहे आताही चालू आहे. त्यांच्यावर खूप दबाव आहे मला मान्य आहे. पण तो दबाव ते पेलू शकतील म्हणून तर त्या हुद्द्यावरती ती सगळी मोठी मंडळी बसली आहेत. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातल्या एका चौकातला किंव रस्त्यावरचा नाही तर प्रत्येक गावातला, शहरातला देशातल्या प्रत्येक रस्त्यावरचा हा प्रश्न आहे."
तो पुढे म्हणाला, "फोटोतील या रस्त्याची अवस्था बघून मला राग आला, लाज वाटली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे पुतळा आहे आणि गेले तीन महिने तो पुतळा लाल फडक्यात तसाच गुंडाळलेला आहे. त्याची स्वच्छता कशी होतीये मला माहित नाही. पुतळ्याचं अजून लोकार्पण झालेलं नाही. अनावरणासाठी कोणत्या राजकारण्याची चिठ्ठी निघणार आहे याची कदाचित स्पर्धा चालू असेल. पण पुतळा इन्स्टॉल करुन त्या चौकाचं सुशोभीकरण करणं हा जो काही स्तुत्य उपक्रम आहे पण ते करताना त्याच्या मागच्या तीन चार महिन्यांचं गणित पाहिलं तर त्या रस्त्याची जी काय परिस्थिती आहे ती अशीच आहे. कुठल्या शिवभक्ताला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेले, काही माणसं दुर्देवाने गेले बघवतील हो? हा प्रश्न विचारणं खरंच गरजेचं आहे. कारण जन्माष्टमीच्या निमित्ताने व्हिडिओ मुद्दाम टाकतोय कारण याच रस्त्यावर जन्माष्टमीला येणाऱ्या सेलिब्रिटींचे इतके फोटो लागलेत, इतके लाख बक्षीस वगरे या इतक्या जाहिराती आहेत त्यात कार्यकर्त्यांचे छोटे छोटे फोटो लागलेत. हा सगळा खर्च दिखाव्यात होतोय त्यापेक्षा मूलभूत सोयी आधी नीट द्या. तो रस्ता नीट केला नाही आणि तिथे अपघात झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा माझा प्रश्न बीएमसी, मीराभाइंदर पालिकेला विचारतोय. इतक्या महत्वाच्या चौकाची ही अवस्था असेल तर पुतळ्याचं अनावण करायला येणारा जो राजकारणी असेल त्याच्यावेळीही तो रस्ता तसाच राहुदे. त्यांच्या पाठीचं हाड मोडू दे, त्यांना ब्लॅडरचे प्रॉब्लेम होऊ दे, त्यांच्या गाडीचं चाक पंक्चर होऊ दे, त्यांच्यासमोर अपघात घडू दे अशी माझी मागणी आहे. हे इतक्या निर्लज्जपणे आपण सण किती मोठ्या पद्धतीने साजरा करतोय, लाखोंचं बक्षीस ठेवतोय त्यापेक्षा ते बजेट रस्ता नीट करुन दिलं तर मी तुमचा ऋणी असेल. नवीन पिढी फार चोखंदळपणे तुमच्या राजकारणाकडे बघतेय आम्हाला गृहित धरु नका."