Join us

नाटकातील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक शशांकला म्हणाले, 'अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 8:54 AM

टीव्ही अभिनेता म्हणून दुय्यम वागणूक मिळते का यावर शशांक स्पष्टच बोलला आहे.

टेलिव्हिजनवरील चॉकलेट बॉय मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. मनोरंजनसृष्टीतील, टीव्ही माध्यमातील अनेक प्रश्नांवर न घाबरता त्याने नेहमी आवाज उठवला आहे. शशांकची टीव्ही अभिनेता अशीच ओळख झाली आहे का? शशांक टीव्हीतच रमतो का? अशा अनेक प्रश्नांवर त्याने एका मुलाखतीत उत्तरं दिली आहेत. तसंच नाटक क्षेत्रात आल्यावर त्याला कोणता अनुभव आला याचाही खुलासा त्याने केलाय.

'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनलला शशांकने नुकतीच मुलाखत दिली. टीव्ही कलाकारांना सिनेमा, नाटक क्षेत्रात दुय्यम वागणूक दिली जाते का? यावर शशांकने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "नाटकातले खूप मोठे अभिनेते, दिग्दर्शक ते एका मुलाखतीत म्हणाले होते, 'हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आजचे आता व्यावसायिक नाटकं करायला लागले. एक सिरिअल केली आता हा नाटकात काम करतोय.' माझं असं झालं की असं नका म्हणू तुम्ही. तुम्ही पण कशानेतरी सुरुवात केली असेल ना तर आम्ही टेलिव्हिजनने सुरुवात केली. पण याचा अर्थ हा नाही की आम्ही पात्र नाही आहोत किंवा  आमचं नाटकात येणं वैध नाही. असं नाही होऊ शकत"

शशांक पुढे म्हणाला, "तुम्ही जी आत्ता उदाहरणं देत आहात की तुमच्यावेळी काम करताना टॉयलेट्स नसायची, सोयी नसायच्या, कसेही प्रवास केलेत, खस्ता खाऊन आम्ही नाटक जीवंत ठेवलंय. खूप आदर करतो मी त्याचा. तुम्ही ते जीवंत ठेवलंत म्हणून आज आम्ही ते करु शकतोय. पण आमच्याही पिढीने आज तसंच सगळं केलं पाहिजे असं काही नाहीए. आमची पिढी आज काही मागणी करते आहे तर त्यांचीही काही कारणं असतील."

टीव्ही अभिनेता आहे म्हणजे त्याला दुय्यम वागणूक देणं योग्य नाही असंच शशांकने त्याच्या या मुलाखतीतून स्पष्ट केलंय. जिथे बच्चन साहेब सुद्धा टीव्हीवर येतात तिथे तुम्ही बोलणारे कोण असा सवालही त्याने उपस्थित केलाय. शशांकची ही मुलाखत प्रेक्षकांना खूपच आवडली असून अतिशय प्रामाणिक माणूस, अभिनेता म्हणत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलंय.

टॅग्स :शशांक केतकरमराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकारनाटक