छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील त्याने साकारलेलं श्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. शशांक सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींबाबत शशांक सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतो.
सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर शशांकने त्याचं मतं मांडलं आहे. शशांकने नुकतीच तारांगण या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "राज्यात काय घडतंय यावर माझं लक्ष आहे. कारण, कलाकार होण्याआधी मी एक नागरिक आहे. मी एक माणूस आहे. आणि रस्त्यावर चालताना, फिरताना, भाजी घेताना, शूटिंग करताना मला प्रॉब्लेम दिसतात. त्याबरोबरच देशात होणारी विकासाची कामंही दिसत आहेत. ज्यांनी चांगली कामं केली आहेत, त्यांचं मी कौतुक करतो. इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाचा वेग न थांबवता विकास करणं ही अवघड गोष्ट आहे."
"राज्यात जे काही सुरू आहे. ते काही पहिल्यांदा घडत नाहीये. याआधीही अनेकदा या गोष्टी घडलेल्या आहेत. मी एक व्हिडिओ पाहिला. त्यात असं म्हटलं गेलं की अमित शहांचा मुलगा बीसीसीआयचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो? त्याने कुठे क्रिकेट खेळलं आहे. मग मा. शरद पवारसुद्धा आयसीसीचे अध्यक्ष होते. ते तरी कुठे क्रिकेट खेळले होते. ज्ञान असणाऱ्या आणि त्यासाठी लागणारा बिझनेस आणू शकणाऱ्या योग्य व्यक्तीला त्या त्या जागी बसवलं जातं. हे अनेकदा घडलेलं आहे. सध्याचं राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचं सुरू आहे. यात आपण न पडलेलंच बरं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते तसंही जिंकणार आहेत. हे माझं प्रांजळ मत आहे. पण, जिथे आपण जिंकून येऊ की नाही अशी शंका असेल. तिथला उमेदवार आपल्या पक्षात घेणं हे सगळेच करत आलेले आहेत. जनतेची प्रगती होणार असेल. तर तुम्ही कोणालाही पक्षात घ्या आणि काढा. देश चांगल्या पद्धतीने घडवा," असंही पुढे शशांक म्हणाला.
शशांक सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला शशांक सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही झळकला आहे.