‘लाखात एक आपला फौजी' असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने जवळपास गेल्या २ वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. अज्या आणि शीतल यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत.
लागीरं झालं जी या मालिकेत प्रत्येकच सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. मग ती दिवाळी असो, होळी किंवा ईद. शीतल आणि अजिंक्यचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने त्यांच्या परिवारात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार यात शंका नाही. गुढी म्हणजे आनंदाचं प्रतिक. या दिवशी शुभकार्याचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे.
आपल्या कुटुंबांचे सर्व संकटापासून संरक्षण करण्यासाठी गुढी भारली जाते. शीतल आणि अजिंक्य यांना यावर्षी गुढी उभारण्याचा मान मिळणार आहे. मामी स्वतःच त्या दोघांना गुढी उभारण्याचा मान देते. तसेच जयडी आणि हर्षवर्धन यांना त्यांच्या बंगल्यावर गुढी बांधण्याचं सुचवते. त्यांचं ऐकून हर्षवर्धन देखील त्यांच्या घरी गुढी बांधायला जातात. मामी आणि शीतल, हर्षवर्धन व जयडीला त्यांच्या घरी पाठवण्यात यशस्वी ठरतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.