अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत असून तुनिषाच्या आईने शिजान खानवर गंभीर आरोप केले आहेत. आज तुनिषाचा वाढदिवस आहे. ती जर या जगात असती तर आज 21 वा वाढदिवस तिने सेलिब्रेट केला असता. तुनिषानं २४ डिसेंबरला 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. शिजानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप आईने केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिजानला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. शिजान सध्या तुरुंगात आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
आनंदी होती तुनिषा दरम्यान, शिजान खानचा मित्र शान शंकर मिश्रा याचं वक्तव्यसमोर आलं आहे. आत्महत्येच्या काही तास आधी तुनिषा शर्मा खूप आनंदी होती, असा दावा शानने केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना शान म्हणाला, "तुनिषा त्या दिवशी खूप आनंदी होती. असे काहीही घडले नाही, ज्यासाठी अभिनेत्रीला हे टोकचं पाऊल उचलावं लागले. शिजान हॉस्पिटलमध्ये खूप रडत होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे."
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शिजान खान तुनिषा शर्माला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसत होता. मात्र तुनिषाच्या त्यापूर्वीच मृत्यू झाला. शान पुढे म्हणाला, "शिजान खूप शांत व्यक्ती आहे. आजपर्यंत मी त्याला कोणावरही रागावलेले पाहिले नाही. संपूर्ण सेटवर सगळंजण तुनिषाचे लहान बाळासारखे लाड करायचे. शिजान ड्रग्स घेत नाही. तसेच तो नशाही करत नाही. मी शिजानसोबत खूप वेळ घालवला, पण तो कधीच तुनिशाबद्दल काही बोलला नाही.
ज्या दिवशी तुनिषा शर्माने आत्महत्या केली, त्या दिवशी सेटवरील वातावरण रोजचसारखेच होते. शिजानशी १५ मिनिटं बोलल्यानंतरच तुनिषाने आत्महत्या केली. दोघेही मेसेजवर बोलले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार वालीव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हाही आम्ही शिजानला त्या वेळी झालेल्या संभाषणाबद्दल विचारले तेव्हा तो रडायला लागतो. या दोघांमध्ये काय संभाषण झाले हे शिजानने अद्याप सांगितलेले नाही.