Join us

शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग मालिकेतील शालीन भानोत सांगतोय, “‘अस्सी’-‘तुस्सी’ समजून घेणं अवघड होतं!”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 1:30 PM

नेहमीच्या सासू-सुनांमधील भांडणांच्या विषयांकडून भारतीय टीव्ही मालिकांचा प्रवास आता भव्य ऐतिहासिक मालिकांकडे सुरू आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांच्या शोधात असलेले टीव्ही ...

नेहमीच्या सासू-सुनांमधील भांडणांच्या विषयांकडून भारतीय टीव्ही मालिकांचा प्रवास आता भव्य ऐतिहासिक मालिकांकडे सुरू आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांच्या शोधात असलेले टीव्ही कलाकार या बदलामुळे खुशीत आहेत. शालीन भानोत हा टीव्हीवरील ज्येष्ठ कलाकार शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग या मालिकेतील भूमिकेद्वारे पुन्हा एकदा भव्य ऐतिहासिक मालिकेत भूमिका साकारण्यास सिध्द झाला आहे. भारतीय टीव्हीवरील या बदलांबद्दल शालीन समाधानी आहे. शालीन सांगतो, “महानगरांतील मुलांना त्यांच्या देशाचा इतिहास आणि संस्कृती यांची माहिती असणं आवश्यक असल्याने टीव्ही मालिकांच्या विषयातील हा बदल स्वागतार्ह आहे. सध्याच्या काळात पालकांकडे त्यांच्या मुलांचा अभ्यास घेण्यासाठीही वेळ नसतो. त्यामुळे अशा मालिका मुलांना या विषयांची माहिती देण्यात उपयुक्त ठरतात.” परंतु धर्म आणि संस्कृती या विषयांबाबत लोक संवेदनशील बनले असल्याने अशा विषयाची निवड करणं धोक्याचे ठरणार नाही का? “आम्ही त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आहोत आणि आमचे हेतू शुध्द आहेत, हे प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे.आम्ही लोकांमध्ये सदभावना आणि आनंद पोहोचविण्याचं काम करीत आहोत. तसंच ही मालिका हा विद्यार्थ्यांना महाराजा रणजितसिंग यांच्या कार्याची आणि या महान शीख योद्ध्याची माहिती देणारा इतिहास आहे. त्यातून आजचे तरुण काही प्रेरणा घेऊ शकतात,” असे शालीनने सांगितले. तो म्हणाला, “या विषयात वास्तव चुकीचे दाखविले जाऊ नये, म्हणून संशोधकांची एक मोठी टीम आमच्याकडे आहे.या मालिकेच्या विषयासाठी सखोल अभ्यास करण्यात आला असून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. अर्थात आम्हीही माणसंच आहोत आणि चुका माणसांच्याच हातून होतात.”शालीन हा शीख नाही किंवा पंजाबीही नाही. तरीही त्याला ही भूमिका देऊ करण्यात आल्यावर त्याला धक्काच बसला होता. तरीही एक आव्हान म्हणून शालीनने रणजितसिंग यांचे वडील महासिंग यांची भूमिका स्वीकारली. “मी आता एक दशकभर अभिनय क्षेत्रात असलो, तरी ही भूमिका माझी आजवरची सर्वात आव्हानात्मक होती. कारण मला पंजाबी भाषा येत नाही. नवी भाषा शिकण्यात मजा येत असली, तरी कधी कधी त्याचा कंटाळाही येत होता. त्यातील अस्सी, तुस्सी, भाभी यासारखे शब्द उच्चारणं आणि त्यांचा वापर करणं हे जड जात होतं. परंतु सर्वात कठीण काम घोडेस्वारी शिकण्याचं होतं. त्यामुळे मी पुरता त्रासून गेलो,” असे शालीनने सांगितले. मग महासिंग यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने कोणती तयारी केली होती? “त्यासाठी मी एका पंजाबी शिक्षकाची नियुक्ती केली; परंतु अशा शिक्षकाला मुंबईत शोधून काढणं हेही एक कामच होऊन बसलं. पुढचे नऊ जिवस मी घराबाहेरच पडलो नाही. मी पंजाबी चित्रपट पाहात होतो आणि पंजाबी लोकसंगीत ऐकत होतो. आता मी त्यात पुष्कळच पारंगत झालो आहे, असं वाटतं,” असे शालीनने सांगितले.