Join us

शेतकरीच नवरा हवा मालिका लवकरच येणार भेटीला, रेवा आणि सयाजीची प्रेमकथा मिळणार पाहायला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 6:06 PM

कॉर्पोरेट जगात वावरणारी रेवा जेव्हा सयाजीला भेटेल तेव्हा काय होईल ?

आजच्या काळात प्रेमाची व्याख्या जरा बदलेली दिसते आहे. मुलगा किंवा मुलगी त्यांच्या होणाऱ्या जोडीदारा बद्दलच्या अपेक्षा ठरलेल्या असतात. आज २१ व्या शतकात सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असताना देखील सामान्य माणूस असो वा गडगंज संपत्ती असलेला माणूस असो तो शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर विसंबून आहे. शेतकरी हा शब्द ऐकताच आपला माणूस, जिव्हाळा, प्रेम आणि आदर अशा भावना आपल्या मनात येतात तर दुसरीकडे डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या हालअपेष्टा, त्यांचे काबाड कष्ट, रात्रंदिवस त्याचे परिस्थितीशी झटणं. 

आज त्यांच्यामुळे आपण चार घास खाऊ शकतो त्यांची हि परिस्थिती आहे. पण, हे सगळं असताना जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला “शेतकरीच नवरा हवा” तेव्हा काय होईल ? आज समाजामध्ये अश्या किती मुली आहेत ज्यांना शेतकरी मुलाशी लग्न करायचे आहे ? कसा असेल रेवा आणि सयाजीचा प्रवास ? कसं फुलेलं यांच्यातील प्रेम ? शुभारंभ होत आहे मातीतल्या प्रेमकथेचा... वास्तवाच्या जवळ घेऊन जाणारी आणि प्रत्येकाला पुन्हाएकदा विचार करण्यास भाग पडणारी मालिका… जिथे बघायला मिळणार आहे नाती आणि माती जपणाऱ्या शेतकऱ्याची हळुवार प्रेमकथा. रेवा आणि सयाजीच्या अनोख्या प्रेमाचा गंध संपूर्ण महाराष्ट्राभर दरवळणार. "शेतकरीच नवरा हवा" १४ नोव्हेंबरपासून सोम ते शनि संध्या ६.३० वा. कलर्स मराठीवर. 

शेतीविषयी विशेष प्रेम असलेला सुशिक्षित, समजूतदार, देखणा असा सयाजी. सयाजीचे ध्येय लहानपणापासून ठरलेलं आहे, आजोबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने सुरुवातीपासून आपले सर्वस्व शेतीसाठी पणाला लावले. अॅग्रीकल्चर मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शेतीला पुन्हा सोन्याचे दिवस आणायचे हा त्याचा ठाम निर्धार आहे... तर दुसरीकडे आधुनिकतेचा वसा जपणारी, कॉर्पोरेट जगात वावरणारी रेवा जेव्हा सयाजीला भेटेल तेव्हा काय होईल ? कशी असेल यांची पहिली भेट ? ते म्हणतात ना  रेशीमबंधांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात म्हणे. नशीब अशाप्रकारे गोष्टी जुळवून आणत रेवा सयाजीच्या गावी येते. आणि इथून सुरुवात होते मातीशी नातं जोडलेल्या सयाजी आणि रेवाच्या एका वेगळ्या प्रेमकथेला. हि प्रेमकथा कशी फुलेलं ? हे हळूहळू उलघडेल.

टॅग्स :कलर्स मराठी