Join us  

माझं गाणं संपलं आणि..., गायक आनंद शिंदेंसाठी नातवाची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:55 AM

Anand Shinde : शिंदे घराण्याच्या पाचव्या पिढीतील आल्हाद शिंदे (Aalhad Shinde) याने भीमगीत सादर केलं. नातवाचं गाणं ऐकताना आजोबा आनंद शिंदे भारावले नसतील तर नवल.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भक्तिगीतं, भीमगीतं, लोकगीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा हाच संगीताचा वारसा आता आनंद शिंदे (Anand Shinde ) आणि त्यांची नातवंड पुढे चालवताना दिसत आहेत.  शिंदे घराण्याची पाचवी पिढी सुद्धा सुरेल संगीताचा वारसा पुढे नेताना दिसत आहे. नुकताच सोनी मराठी वाहिनीवर ‘जय भीम’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमात शिंदे घराण्याच्या पाचव्या पिढीतील आल्हाद शिंदे (Aalhad Shinde) यानेही भीमगीतं सादर केली. नातवाचं गाणं ऐकताना आजोबा आनंद शिंदे भारावले नसतील तर नवल. आता आल्हादने याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे.

 आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुलं आहेत.  उत्कर्ष आणि आदर्श शिंदे संगीत क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. तर हर्षद शिंदे हा अ‍ॅनिमेशन इंजिनिअर आहेत. त्याचा मुलगा आल्हाद शिंदे हा शिंदे घराण्याची पाचवी पिढी म्हणून संगीत क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करू पाहत आहे. नुकतेच सोनी मराठीच्या  मंचावरून त्याला गायची  संधी मिळाली. यानंतर चिमुकल्या आल्हादने सोशल मीडियावर याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

उत्कर्ष शिंदेच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये आल्हाद लिहितो, ‘ दोन वर्षांनी परत तुम्हा सर्वांसमोर सादर झालो. खूप धमाल केली.खूप काही शिकायला मिळालं आणि माझ्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट ही होती की आज मला माझ्या आजोबांसमोर,म्हणजेच आनंद शिंदे यांच्या समोर माझं गाणं,‘पुस्तक भिमाचं रमाईचं’ गायचे होते. मग ते गाणं परफेक्ट होणे ह्याची जबाबदारी घेऊन, माझे काका,उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे ह्यांनी मला खूप मदत केली.जरी आम्ही एक परिवार असलो,तरी त्या क्षणाला ते माझे गुरु होते आणि मी त्यांचा शिष्य होतो. ही माझ्यासाठी एक अवघड परीक्षा होती. जेव्हा माझं गाणं संपलं,जी पहिली गोष्ट मी पाहिली ती म्हणजे पप्पांचे डोळे भरुन आले होते. मला पप्पांनी सांगितले ‘मी तुला लहानपणा पासून, प्रल्हाद दादा बोलायचो.आज पासुन तूच माझा प्रल्हाद दादा आहेस. हे आईकुन मला रडू आले. माझे काका आणि माझे आजोबा ह्यांनी भरभरून आशिर्वाद दिले. असंच माझ्यावर आणि शिंदेशाही वर प्रेम करत राहा...’

 

टॅग्स :टेलिव्हिजनसोनी मराठी