सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून लागिर झालं जी मालिकेत शीतलीच्या भूमिकांतून ती घराघरात पोहचली आहे. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी नवीन मराठी मालिका, कुसुम घेऊन येत आहे.
आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
२००१ साली हिंदीमध्ये 'कुसुम' नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी रिमेक आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती.
कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.