मराठी आणि हिंदी दोन्ही बिग बॉस गाजवणारा स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे (Shiv Thakare) प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्याचा साधेपणा तरी रुबाबदार व्यक्तिमत्व प्रेक्षकांना भावतं. शिव अगदीच मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे. टॅलेंटच्या जोरावर आज तो इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतीच शिवने ३० लाखांची कार खरेदी केली. त्याचे फोटो शेअर करताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इतकंच नाही तर शिव आता स्वत:चे स्नॅक कॉर्नरही (snack corner) सुरु करत आहे. याचे नाव त्याने 'ठाकरे - चाय अँड स्नॅक' असं ठेवलं आहे. आपल्या या रेस्टॉरंटच्या उद्घाटनवेळी शिवने माध्यमांशी संवाद साधला.
'ठाकरे-चाय अँड स्नॅक' च्या उद्घाटनावेळी शिव म्हणाला, 'मला मुंबई, पुणे आणि नंतर अमरावती इथेही ब्रांच सुरु करायची आहे. मागील काही वर्षात मी जी काही मेहनत घेतली त्याचे आता फळ मिळत आहे. सिनेमांबद्दल बोलायचं तर आशा आहे की मी ६ महिन्यात किंवा १ वर्षात स्वत:च्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला तुम्हाला भेटेल. तेव्हा तुम्ही माझ्या कामाचं कौतुक करत असाल. '
शिव पुढे म्हणाला, 'माझ्या आईबाबांना आज माझा अभिमान वाटतो. मात्र मी त्यांना वेळ देऊ शकत नाही ही त्यांची तक्रार आहे. कधी कधी माझ्या बाबतीत अफवा ऐकून ते दु:खी होतात. अनेकदा मला रात्री १२ वाजता फोन करतात आणि मी त्यांना समजावतो की हे सगळं खोटं आहे. मी त्यांना या इंडस्ट्रीविषयी सांगितले आहे मात्र त्यांना ते नीट समजलेले नाही. आता जेव्हा मी अमरावतीला घरी जाईन तेव्हा त्यांना समजावेन. पण ते खूप खूश आहेत. जोपर्यंत मी जीवंत आहे मी मंडली तुटू देणार नाही. आमचा ग्रुप एक कुटुंबासारखा आहे. आणि कुटुंब म्हणलं की रुसवे फुगवे आलेच. पण सगळं काही ठीक आहे.'