Join us

मराठी असल्याने मला हिंदी Bigg boss मध्ये कमी लेखलं; शिव ठाकरेचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:37 IST

Shiv Thakare: बिग बॉस मराठी २ चा विजेता ठरलेल्या शिवने बिग बॉस १६ चं पर्वही गाजवलं.

हिंदी आणि मराठी दोन्ही Bigg boss गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे (shiv Thakare).  टास्क खेळण्याची उत्तम पद्धत आणि स्वभावातील नम्रपणा यामुळे शिवने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. 'बिग बॉस मराठी २'(Bigg boss marathi 2) चा विजेता ठरलेल्या शिवने बिग बॉस १६ चं (bigg boss 16) पर्वही गाजवलं. विशेष म्हणजे या घरात राहून त्याने त्याचा मराठीबाणा जपला. परंतु, हे पर्व सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याला मराठी असल्यामुळे कमी लेखलं गेलं. याविषयी एका मुलाखतीत त्याने खुलासा केला आहे.

अलिकडेच झालेल्या मटा सन्मान सोहळ्यामध्ये शिवने हजेरी लावली होती. यावेळी त्याने बिग बॉस १६ मध्ये आलेल्या अनुभवांचं कथन केलं. त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या घरात मला सुरुवातीला कमी लेखलं गेलं, असा धक्कादायक खुलासा त्याने केला.

काय म्हणाला शिव?

"बिग बॉस मराठी आणि हिंदीमध्ये फारसा फरक नव्हता. फक्त माणसं वेगळी होती.  बिग बॉस मराठीमध्ये असताना आपल्या मातीत, आपल्या माणसांमध्ये, कुटुंबात खेळतोय असं वाटायचं. पण हिंदीत गेल्यावर बाहेर कुठे तरी गेलोय असं वाटलं. सुरुवातीला मला असं जाणवलं की कुठे तरी आपल्याला कमी लेखलं जातंय. पहिल्या आठवड्यात तसं झालं. मराठी मुलगा आहे, रिजनलमधून आलाय असं म्हणत कमी लेखलं गेलं, पण नंतर त्यांना समजलं की मराठी माणसांसोबत पंगे घ्यायचे नाहीत", असं शिव म्हणाला.

पुढे तो म्हणतो,  "पण, तिथेही मला मज्जा आली. त्यांचं असं झालं होतं की तू रिजनलमधून आला आहेस, मराठीमधून आलाय. पण, त्यांना बरोबर नंतर माझ्याकडून उत्तरं मिळत गेली. तेव्हा त्यांना समजलं की हे मराठी लोक भारी असतात, फक्त ते दाखवत नाहीत. त्यांनी मराठीबाणा आणि मावळा काय असतो हे मी दाखवलं. त्यावेळी खरी मज्जा आली."

दरम्यान, शिव 'बिग बॉस १६' मध्ये रनर अप ठरला. मात्र, तरीदेखील सोशल मीडियावर त्याचीच हवा झाली. अमरावतीमध्येही त्याचं मोठं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉसटेलिव्हिजनसेलिब्रिटी