सीआयडी (CID) या क्राइम थ्रिलर मालिकेचे अनेक चाहते आहेत. जवळपास २० वर्ष या शोने सर्वांचं मनोरंजन केलं होतं. प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. २०१८ मध्ये शोने सर्वांचा निरोप घेतला होता. तर काही महिन्यांपूर्वी याचा दुसरा सीझन आला. यामध्येही एसीपी प्रद्युम्न, अभिजीत, दया हे गाजलेले पात्र आले. पण आता एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चांवर ही भूमिका करणारे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'सीआयडी सीझन २' मध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू होतो असं दाखवण्यात येणार आहे. नुकताच हा एपिसोड शूटही करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान यावर अभिनेते शिवाजी साटम मिड डेशी बोलताना करताना म्हणाले, "एसीपी प्रद्युम्न ही भूमिका शोमधून खरंच एक्झिट घेईल का नाही मला खरोखरंच कल्पना नाही. सध्या मी मोठ्या सुट्टीवर आहे आणि सुट्टीचा आनंद घेतोय. सीआयडीच्या आगामी शूटिंगबाबतीत मला काहीच माहिती मिळालेली नाही."
शिवाजी साटम यांना एसीपी प्रद्युम्न म्हणूनच जगभरात ओळखलं जातं इतकी त्यांची लोकप्रियता आहे. 'कुछ तो गडबड है' हा त्यांचा डायलॉग तर तुफान व्हायरल झाला. आजही यावर मीम्स बनतात. दरम्यान हे मुख्य पात्रच शोमधून बाहेर पडलं तर मग मालिकेत काही मजा राहणार नाही अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे. आता खरोखरंच एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार का हे येत्या एपिसोड्समध्ये कळेलच.
'सीआयडी'ची सुरुवात १९९८ साली झाली होती. २० वर्ष मालिका चालली आणि २०१८ मध्ये शोने निरोप घेतला. तेव्हा सगळेच भावुक झाले होते. टीआरपी आणि चॅनलच्या निर्णयामुळेच शो बंद करावा लागल्याचं शिवाजी साटम म्हणाले होते.