शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. शोएब आणि दीपिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. त्यांचं युट्यूब चॅनेलही आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ते चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक जीवनातील अपडेट्स देत असतात. नुकतंच शोएबने त्याच्या सासूला म्हणजे दीपिकाच्या आईला एक फ्लॅट गिफ्ट केला आहे. यामुळे अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शोएबने त्याच्या युट्यूबवरुन एक नवीन व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये त्याने दीपिकाच्या आईला फ्लॅट गिफ्ट केल्याचं म्हटलं आहे. शोएब त्याच्या व्लॉगमध्ये सांगतो की २०१४ पासून त्याचे आईवडील ज्या फ्लॅटमध्ये राहत होते तो फ्लॅट घरमालकाने विकण्यासाठी काढला होता. पण, तेवढे पैसे नव्हते. शेवटी काहीतरी मार्ग काढून अभिनेत्याने त्याच्या आईवडिलांसाठी हा फ्लॅट खरेदी केला.
अभिनेत्याने केवळ त्याच्या आईवडिलांसाठीच नाही तर सासूसाठीही फ्लॅट खरेदी केला आहे. दीपिका या व्हिडिओत म्हणते की सासू-सासरे, नणंद आणि तिची आई गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच बिल्डिंगमध्ये राहत आहेत. त्यामुळे इथून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा विचार ते करू शकत नाहीत. "आईला फ्लॅट घेऊन दिला पण, त्याबरोबरच सासूलाही फ्लॅट गिफ्ट केला. हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे", असं म्हणत दीपिकाने शोएबचं कौतुक केलं आहे.
जावयाने फ्लॅट गिफ्ट केल्यानंतर दीपिकाची आईही भावुक झाली. "यापेक्षा जास्त माझ्यासाठी काहीच असू शकत नाही. या कुटुंबाने मला इतकं काही दिलं आहे की मी सांगू शकत नाही. सगळ्यांचे आभार", असं दीपिकाची आई म्हणत आहे. दीपिकाच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला असून ते एकमेकांपासून वेगळे राहतात.