झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांच्या प्रेमानं सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला आहे. या मालिकेतीलसुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे हिची नुकतीच फसवणूक झाली असल्याचे समजते आहे. अमृताला या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे. मात्र तिचे नुकतेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे तिने एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले. इतकेच नाही तर अमृताने मी केलेली चूक तुम्ही करू नका असेही सांगितले आहे.
अमृताने तिच्यासोबत घडलेला प्रकार पोस्टच्या माध्यमातून सांगितला. ती म्हणाली की, “नमस्कार मी अमृता धोंगडे. म्हणजेच तुमची मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी. 28 ऑगस्टला मला दुपारी एक मेल आला इंस्टाग्राम व्हेरिफिकेशनसाठी त्यानंतर लगेचच मला व्हॉट्सअपवर मेसेज आला तो नंबर तुर्कीचा होता. पण मला वाटले तो खरेच इंस्टाग्राम व्हेरिफिकेशनसाठी मेसेज आहे म्हणून त्यांनी मला एक लिंक पाठवली या लिंक वर जाऊन चुकून मी माझे युजरनेम आणि पासवर्ड दिला आणि थोड्या वेळाने माझा अकाउंट मला दिसणे बंद झाले.
40,000 रुपयांची केली मागणी
तिने पुढे सांगितले की, त्यानंतर त्याने मला दुसऱ्या एका नंबर वरून मेसेज केला की तुझा अकाऊंट हे आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही जेवढे पैसे सांगतोय तेवढे दे आणि तुझा अकाउंट तुला परत घे. त्यांनी मला 40,000 ची मागणी केली तेव्हा माझे अकाउंट हॅक झाले होते. मी काहीच करू शकले नाही, त्यामुळे मला माझे इंस्टाग्रामचे पेज हे गमवावे लागले. माझे इंस्टाग्राम वर फॉलोवर्स हे 77.6k एवढे होते. त्यामुळे मी सर्वांना एक विनंती करेन प्लीज मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, व कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आतापर्यंत तुम्ही माझ्यावर जेवढे प्रेम केले तसेच प्रेम इथून पुढेही राहू द्या. मी इंस्टाग्रामचे नवीन पेज बनवत आहे तरी तुम्ही सगळ्यांनी मला तिथे नक्की फॉलो करा..आणि ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा…काळजी घ्या.
चित्रपटातून केले चित्रपटसृष्टीत पदार्पण
झी मराठी वाहिनीवर मिसेस मुख्यमंत्री या मालिकाद्वारे अमृता धोंगडे घराघरामध्ये पोहोचली आहे.
अमृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख मला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली.