'कुमकुम भाग्य' मालिकेतील अभिनेत्री तृप्ती शंखधर हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तृप्ती आपल्या वडिलांवर अनेक आरोप लावत आहे. तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने यात म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली येथे तृप्ती राहते. तिच्या सोबत तिची आई आणि भावंड असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. तृप्ती आणि कुटुंबाला तिच्या वडिलांपासून धोका असल्याचे तिचे म्हणणे आहे. व्हिडीओच्या माध्यमातून बरेलीच्या पोलिसांना सुरक्षा मिळवून देण्याचं आवाहन केलं आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तृप्तीने मुख्यमंत्री योगी आणि बरेलीच्या पोलिसांना टॅग केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वडिल मारहाण करत मानसिक छळ करत असल्याचे तिने म्हटले आहे. ते जिथे सांगतिल तिथे लग्न करण्यासाठी ते जबरदस्ती करत होते. तृप्ती 19 वर्षांची आहे आणि तिच्या वडिलांची इच्छा आहे की तिने एका 28 वर्षांच्या मुलाशी लग्न करावे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला.
तप्तीच्या आईनेही वडिलांवर मारहाणीचा आरोप केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून तृप्ती आणि तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. तृप्तीने कुमकुम भाग्य, देव-2, परमावतार श्री कृष्ण, जिंदगी यू टर्न, कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. सध्या ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपले नशीब आजमावत आहे.