स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत लवकरच धक्कादायक वळण येणार आहे. एकीकडे अरुंधतीने अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस दिली आहे तर दुसरीकडे संजनाचे वागणेही अनिरुद्धला खटकू लागले आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशीच काहीशी अवस्था अनिरुद्धची झाली आहे.
स्वत:च्या चुकीमुळे एकटा पडलेल्या अनिरुद्धच्या मनात बरीच मानसिक उलथापालथ सुरु आहे. याच तणावात असताना अनिरुद्धच्या कारला अपघात होणार आहे. अरुंधती आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारा हा प्रसंग आहे. या कठीण प्रसंगात अनिरुद्धच्या मदतीसाठी अरुंधती उभी रहाणार की संजना हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल.
मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना अनिरुद्ध साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, 'अनिरुद्ध साकारणे हे पहिल्या दिवसापासून मी आव्हान म्हणूनच स्वीकारले आहे. १२ वर्षांपूर्वी तो संजनाच्या प्रेमात पडला. पण या सगळ्यात त्याने त्याच्या कुटुंबाला सांभाळले. अनिरुद्धचे वागणे नीतीमत्तेला धरुन नसले तरी त्याची अशी वेगळी बाजू आहे.
पुढे मिलिंद गवळीने सांगितले की, आता त्याचे आयुष्य अशा वळणावर येऊन पोहोचले आहे जिथे २५ वर्षांचा संसार एकीकडे आणि संजनावरचं प्रेम एकीकडे अशा दोन्ही गोष्टींमध्ये तो अडकला आहे. अनिरुद्ध खऱ्या अर्थाने असहाय्य झाला आहे. याच तणावामध्ये त्याचा अपघात होतो. हा प्रसंग शूट करणे देखील अतिशय आव्हानात्मक होते. मरणाच्या दारात असताना अनिरुद्धच्या मदतीला कोण येणार हे आई कुठे काय करते मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.'