कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रात पुर्वापार पद्धतीने चालत आलेली आहे. मराठवड्याची भूमी तर संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आजही महाराष्ट्रात असे अनेक कीर्तनकार आहेत जे अध्यात्म आणि प्रबोधनाचा सुंदर मिलाफ रचत कीर्तन करतात. हीच बाब लक्षात घेऊन शेमारू मराठीबाणा वाहिनीने गजर माऊलीचा हा कार्यक्रम सुरु केला ज्यामध्ये विविध भागांतील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार किर्तनाच्या माध्यमातून संतांची शिकवण अतिशय रंजक पद्धतीने सांगतात. याच कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी आता लातूरकरांना मिळणार आहे कारण येत्या १४ ते १९ जानेवारी दरम्यान लातूर शहरात गजर माऊलीचा या कार्यक्रमाचं चित्रीकरण होणार आहे. शहरातील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असून यामध्ये प्रेक्षकांना विनाशुल्क सहभागी होता येणार आहे.
राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकार गजर माऊलीचा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, ह.भ.प. महादेव महाराज राऊत, ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, ह.भ.प. सुनीताताई आंधळे, ह.भ.प. जलाल महाराज सय्यद, ह.भ.प. रवी महाराज पिंपळगावकर, ह.भ.प. गणेशानंद महाराज शास्त्री, ह.भ.प. संतोष महाराज पुजारी, ह.भ.प. छगन महाराज खडके, ह.भ.प. गणेश महाराज भगत, ह.भ.प. संजय महाराज हिवराळे आदी लोकप्रिय कीर्तनकार आपल्या प्रवचनातून संतांची शिकवण भक्तांना सांगणार आहेत.
शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे. अध्यात्माच्या माध्यमातून लोकरंजन करणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. ही संधी आता लातूरमधील प्रेक्षकांना मिळणार आहे. यासाठी कोणतेही तिकिट अथवा प्रवेशशुल्क आकरण्यात येणार नसून प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय लातूरमध्ये चित्रीत झालेले हे भाग येत्या २९ जानेवारीपासून शेमारू मराठीबाणा या वाहिनीवरून प्रसारित होणार आहेत.