स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. कलाकारही आपली जबाबदारी चोख पार पाडण्यासाठी जीवाचे रान करतात. मग ते त्यांच्यावर आलेले दुःख कवटाळून चेहऱ्यावर हासू आणून अभिनय करतात. असेच काहीसे आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर घडले. मालिकेत आप्पांची भूमिका साकारणारे किशोर महाबोले यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. ही बातमी त्यांना मालिकेच्या शूटिंगदरम्यान समजली. मात्र तरीदेखील त्यांनी शो मस्ट गो ऑन म्हणत सीन पूर्ण करून ते निघाले. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी मालिकेतील त्यांचे बाबा म्हणजेच आप्पांसोबतचं नातं अधोरेखित करणारी एक पोस्ट नुकतीच शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये मिलिंद गवळी म्हणतात, ‘आई कुठे काय करते मालिकेत आप्पा आणि अनिरुद्ध देशमुख जवळजवळ दीड वर्ष मनातल्या भावनांशी खेळत आहेत. अनिरुद्धचा आप्पांवर खूप जीव आहे. खऱ्या आयुष्यातही आप्पांची भूमिका साकारणाऱ्या किशोर महाबोले यांच्यावर माझा खूप जीव आहे. त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि खूप प्रेम आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. असंख्य कविता त्यांच्या मुखोद्गत आहेत. व. पु. काळेंचं साहित्य तर त्यांचं तोंडपाठ आहे. मोठमोठे डायलॉग त्यांचे असे पाठ असतात. अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि हसमुख आप्पांशिवाय सेटवर कोणालाच करमत नाही. आप्पा हे पात्र सगळ्यांनाच आवडतं.