फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशा कृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा रोवला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिला 'तेजस्वी चेहरा' या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.
हिंदी-मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली श्रिया पिळगांवकर हिने वयाच्या ५व्या वर्षांपासूनच कॅमेराची भाषा शिकली. लहानपणी तिने तू तू मे मे या मालिकेत बिट्टूची भूमिका वठवली. लहानपणापासूनच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं पण तिने तिच्या अभिनय कौशल्याने भारतातच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकता मिळवली.
अभिनयच नव्हे तर श्रियाने दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपली चुणूक दाखवली. तिने द पेन्टेड सिग्नल आणि ड्रेसवाला या २ शॉर्टफिल्म्स दिग्दर्शित केल्या. तसेच पंचगव्य या डॉक्युमेंट्रीच दिग्दर्शन करून तिने वेगळ्याच विषयाला हातघातला. अशा सर्वगुण संपन्न अभिनेत्रीला झी युवा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात 'तेजस्वी चेहरा' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.