इक्बाल, अपना सपना मनी मनी, ओम शांती ओम, गोलमाल 3, हाऊसफुल 2 अशा अनेक सिनेमांत काम करणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. करिअरमध्ये श्रेयसने अनेक सिनेमे केलेत. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. कारण काय? तर मित्रांनी केलेली दगाबाजी. होय, अलीकडे करिअरमधील अनेक धक्कादायक अनुभव श्रेयसने शेअर केले होते. आता हाच श्रेयस छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्याची एक नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.
नुकताच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होऊ घातलेल्या या नव्या मालिकेचे नाव ‘तुझी माझी रेशीम गाठ’ (Tujhi Majhi ReshimGath) असेआहे. प्रोमोत श्रेयस एका रेस्टॉरंटमध्ये एका चिमुकलीसोबत बसलेला दिसतोय. पण त्याचं लक्ष आणखीनच कुठेतरी असल्याचे दिसतेय.ही नवी मालिका कोणत्या वेळेत प्रसारित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. झी मराठीवर येत्या काळात अनेक नव्या मालिका सुरू होत आहेत. मन माझं बाजिंद, ती परत आलीये आणि तुझी माझी रेशीमगाठ अशा या मालिका पाहायला मिळणार म्हटल्यावर साहजिकच प्रेक्षक आनंदात आहेत. म्हणून सोलो सिनेमे चालले नाहीत...श्रेयसने अनेक सिनेमांत काम केले. काही सिनेमात त्याने लीड रोलही साकारला. पण इक्बाल वगळता त्याचे सोलो सिनेमे फार चालले नाहीत. यामागचे कारण त्याने या मुलाखतीत सांगितले होते. मी स्वत:चे मार्केटींग करू शकलो नाही. मी अनेक सोलो सिनेमांत काम केले. पण बहुतेक चालले नाही. माझ्या मते, माझ्यात एकच कमतरता होती. ती म्हणजे, मला स्वत:चे मार्केटींग करता आले नाही. माझ्या कामामुळे मला काम मिळेल, याच भावनेतून मी आत्तापर्यंत काम केले, असे तो म्हणाला होता.