सोनी सब वाहिनीवरील 'माय नेम इज लखन' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे लखनची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकाची चांगलीच पसंती मिळत असून या मालिकेत त्याच्यासोबत अर्चनापुरण सिंग, परमीत सेठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नुकतीच श्रेयसला दुखापत झाली.
'माय नेम इज लखन' या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान कुस्तीच्या दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. पण हे दृश्य चित्रीत करताना श्रेयसच्या खांद्याला चांगलीच दुखापत झाली. श्रेयसला चांगलाच मार लागल्याने काही वेळांचा ब्रेक देखील घ्यावा लागला. श्रेयसची दुखापत पाहून मालिकेच्या टीममधील सगळ्यांनाच टेन्शन आले होते. त्यांनी लगेचच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी श्रेयसला तपासले असता त्यांनी सांगितले की, श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली असून त्याला काही दिवस तरी आराम करावा लागेल. पण डॉक्टरांनी दिलेला सल्ला न मानता श्रेयसने काहीच तासांत चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली. त्याच्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये ही त्याची यामागची भावना होती. याविषयी श्रेयस सांगतो, मला दुखापत झाल्यामुळे काही दिवसांचा आराम घेण्यास सांगण्यात आले होते. पण शो मस्ट गो ऑन ही गोष्ट मी मानतो. त्यामुळे मी लगेचच चित्रीकरणाला सुरुवात केली.
श्रेयसने मराठी चित्रपटसृष्टीद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली असली तरी त्याने आज हिंदीत देखील त्याची चांगली ओळख निर्माण केली आहे. ‘गोलमाल’सीरिज, ‘इकबाल’, ‘डोर’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात आणि ‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये श्रेयसने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहेत. त्याच्या गोलमान अगेन या वर्षंभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. कॉमेडी, गंभीर अशा सगळ्याच भूमिका तो चांगल्याप्रकारे साकारू शकतो हे त्याने त्याच्या अभिनयातून सिद्ध केले आहे. आता तो प्रेक्षकांना लवकरच अश्विनी चौधरी यांच्या सेटलर्स या चित्रपटात दिसणार आहे तसेच तीन दो पाच या त्याच्या आगामी चित्रपटात त्याचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.