कोणतंही क्षेत्र असो घराणेशाही काही अपवाद नाही. राजकारण आणि मनोरंजनसृष्टीत घराणेशाही प्रकर्षाने दिसून येते. यामुळे बाहेरुन येणाऱ्या कलाकारांना लवकर संधी मिळत नाही. हातात आलेली संधी घराणेशाहीमुळे निसटते. मग कितीही टॅलेंट असलं तरी तुम्ही आऊटसाईडर असल्याचा ठपका तुमच्यावर बसतो. याच घराणेशाहीवर मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) काय म्हणालाय बघा.
श्रेयस तळपदे म्हणजे सिनेसृष्टीला लाभलेला अतिशय प्रभावशाली अभिनेता. 'इक्बाल' या त्याच्या पहिल्याच सिनेमातून त्याने अभिनयाचं कौशल्य दाखवून दिलं.श्रेयसने मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. पण घराणेशाहीला तो देखील बळी पडला असावा हे त्याच्या एका वाक्यातून दिसून आलं. झी मराठीवर 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा शो पुन्हा सुरु झाला आहे. या शोमध्ये श्रेयस तळपदेने हजेरी लावली. यातील एका सेगमेंटमध्ये अवधूत गुप्ते काही चिठ्ठ्या श्रेयसला देतो.या चिठ्ठ्यांमध्ये वाक्य लिहिलेलं असतं आणि ते वाक्य कोणासाठी चपखल बसतं हे श्रेयसने सांगायचं असतं.
तर या सेगमेंटमध्ये एका चिठ्ठीत लिहिलेलं असतं, "आता भेटलात पुन्हा भेटू नका". यावर श्रेयस म्हणतो, "हे कोण्या एका व्यक्तीला नाही देऊ शकत. घराणेशाहीला जबाबदार सगळ्यांना मला हे म्हणायचंय, आता भेटलात पुन्हा नका भेटू."
सध्या या एपिसोड प्रोमो रिलीज झाले आहेत. तर ११ जून रोजी श्रेयस तळपदेचा एपिसोड प्रसारित होणार आहे. बऱ्याच वर्षांनी 'खुपते तिथे गुप्ते' हा शो सुरु झाल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत.तर श्रेयस तळपदे लवकरच कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमात दिसणार आहे.