Join us

'श्रीमद् रामायण' मालिकेत लंकाधीश रावणाने श्रीरामाचा एकनिष्ठ दूत हनुमानाला बनवले बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 5:21 PM

Srimad Ramayana : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत रावणपुत्र मेघ नादाने बंदी बनवून रावणासमोर सभेत आणलेल्या हनुमानाला आपल्या सामर्थ्याची प्रचिती देण्यासाठी रावण सर्व प्रयत्न करतो.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत रावणपुत्र मेघ नादाने बंदी बनवून रावणासमोर सभेत आणलेल्या हनुमानाला आपल्या सामर्थ्याची प्रचिती देण्यासाठी रावण सर्व प्रयत्न करतो. परंतु, रावणाच्या आक्रमकतेने हनुमान किंचितही डगमगत नाही आणि श्रीरामाप्रतीची त्याची भक्ती अढळ राहते. त्याचा दृढनिर्धार पाहून संतापलेला रावण सैनिकांना हनुमानाची शेपूट पेटवून देण्याची आज्ञा देतो. आणि यानंतर सुरू होते, लंकादहनाचे सत्र! रावणासमोर हनुमान स्वतःची अमर्याद ताकद दाखवतो. आपल्या पेटलेल्या शेपटीने तो लंका जाळत सुटतो. राम नामाचा जयघोष करत तो रावणाचे साम्राज्य आपल्या जळत्या शेपटीने पेटवून देतो. हनुमानाच्या या कृतीमधून केवळ त्याची रामाप्रतीची भक्ती दिसत नाही, तर लंका दहन ही घटना सदगुणांचा दुर्गुणांवरील विजय दर्शविते, प्रकाशाने अंधकाराशी छेडलेले युद्ध दर्शविते.

 रावणाची भूमिका साकारणारा निकितीन धीर म्हणतो, “रावणाची भूमिका जिवंत करण्याचा अनुभव जबरदस्त आहे. प्रत्येक अध्यायागणिक मला रावणाची ताकद, सामर्थ्य आणि महत्त्वाकांक्षा यांचा शोध घेण्याची संधी मिळाली आहे. आपला अधिकार दाखवण्यासाठी आणि हनुमानाची रामाप्रतीची निष्ठा तोडण्यासाठी तो हनुमानाची शेपूट पेटवून देण्याची आज्ञा आपल्या सैनिकांना देतो. पण आपली अढळ निष्ठा आणि अमर्याद ताकदीने हनुमान त्याचा डाव उलटवतो. स्वतःच्या सामर्थ्याविषयीचा रावणाचा भ्रम दूर करतो. हनुमानाच्या या कृतीमुळे स्वतःला सर्वात सामर्थ्यशाली समजणाऱ्या रावणाला मोठा धक्का बसतो. त्यात भर म्हणून हनुमानाने त्याचा मुलगा अक्षय कुमार याचा वध केल्याच्या संतापाची आग त्याच्या मनात जळते आहे. या पार्श्वभूमीवर लंका दहन अध्याय सुरू होतो आणि धैर्य, भक्ती आणि सद्गुण व दुर्गुण यांच्यातल्या चिरंतन संघर्षाची कहाणी वेग घेते.”