श्वेता तिवारीने कही किसी रोज या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिची भूमिका छोटीशी होती. या मालिकेनंतर काही वर्षांनी तिला कसौटी जिंदगी की या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी दिली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत तिने साकारलेल्या प्रेरणा या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. एवढेच नव्हे तर या मालिकेमुळे छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना व्हायला लागली.
श्वेताने अनेक मालिकांमध्ये काम करण्यासोबतच बिग बॉस, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता. जाने क्या बात हुई, सजन रे झुठ मत बोलो, परवरिश यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका देखील गाजल्या आहेत. तिने मालिकांप्रेमाणे काही चित्रपटांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. पण तिला छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर तिचे स्थान निर्माण करता आले नाही.
श्वेता तिवारीच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. श्वेताने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच तिचे लग्न राजा चौधरी सोबत झाले होते. लग्नाच्या वेळी श्वेता केवळ 19 वर्षांची होती. राजाने देखील काही चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. नच बलिये या कार्यक्रमात देखील ते दोघे एकत्र झळकले होते.
पण लग्नानंतर काहीच वर्षांत राजा आणि प्रेरणामध्ये सतत भांडणं होत होती. दारूच्या नशेत राजाने अनेकवेळा श्वेतावर हात उगारला होता. राजा मारहाण करतो, तसेच त्याने त्यांची मुलगी पलकला पळवण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला असे अनेक आरोप श्वेताने त्यावेळी केले होते. श्वेताने हे सगळे नऊ वर्षं सहन केले आणि नंतर या सगळ्या गोष्टींना कंटाळून 2007 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर पलकचा सांभाळ श्वेता करत आहे. श्वेता आणि राजा यांचा प्रेमविवाह होता. राजाशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असे श्वेताने बिग बॉसच्या घरात असताना सांगितले होते.
श्वेताने 2013 मध्ये अभिनेते अभिनव कोहली सोबत लग्न केले. त्या दोघांना रियांश हा मुलगा आहे.