टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) दीर्घकाळापासून मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी कोर्टात लढत होती. श्वेता व तिचा दुसरा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्या रेयांशच्या कस्टडीवरून वाद सुरू होता. आता या प्रकरणात श्वेताला मोठा दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाने तिच्याकडे मुलाची कस्टडी सोपवली आहे. पती अभिनव कोहलीपासून विभक्त झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून श्वेताने रेयांशला स्वत:जवळ ठेवलं होतं. यादरम्यान अभिनव कोहलीने श्वेतावर अनेकदा गंभीर आरोप केले होते.
श्वेता आपल्याला रेयांशला भेटू देत नाही. ती एक बिझी अभिनेत्री आहे. मुलाला देण्यासाठी तिच्याजवळ वेळ नाही, असं म्हणत त्याने रेयांशची कस्टडी आपल्याला मिळावी, यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. तथापि कोर्टाने त्याची विनंती नाकारत मुलाची कस्टडी श्वेताकडे सोपवली. अर्थात अभिनव कोहली मुलाला भेटू शकणार आहे. रोज अर्धा तास तो व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाशी बोलू शकेल. शिवाय वीकेंडला दोन तास मुलाला श्वेताच्या बिल्डिंग एरियात भेटू शकेल. मात्र यावेळी श्वेता वा तिच्या कुटुंबातील एक व्यक्ति तिथे हजर राहणे गरजेचं असेल.
श्वेताची प्रतिक्रियाकोर्टाच्या या निर्णयावर श्वेताने समाधान व्यक्त केलं आहे. मला हेच हवं होतं. कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करते. गेल्या दोन वर्षात मी जिथे गेले, तिथे अभिनवने मला फॉलो केले आणि गोंधळ घातला. माझ्यासाठी व रेयांशसाठीही हे ठीक नव्हते. अभिनवने मला वाईट आई ठरवलं. मी माझ्या कुटुंबासाठी काम करते आणि माझ्या मुलांना चांगलं आयुष्य देऊ इच्छिते. यात काय चूक आहे? मी कधीही रेयांश व अभिनवला बोलण्यापासून रोखलं नाही, असे श्वेता म्हणाली.श्वेताने 13 जुलै 2013 रोजी अभिनव कोहलीसोबत लग्न केलं होतं. त्याआधी तीन वर्ष दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. 2016 मध्ये श्वेताने मुलगा रेयांशला जन्म दिला. 2017 मध्ये अभिनव व श्वेता यांच्यात वाद सुरू झाले. 2019 मध्ये हे वाद विकोपाला पोहोचले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरू होता.