टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या कौटुंबिक आयुष्यातील वादांमुळे चर्चेत आहेत. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुस-यांदा संसार थाटला. पण काहीच वर्षांत दोघांमध्ये वाद सुरु झालेत. आता श्वेता तिवारीच्या घरातील भांडणं चव्हाट्यावर आली आहेत. श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहली याने पत्नी आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर श्वेता दार उघडत नसून गेल्या अनेक तासांपासून आपण श्वेताच्या घराबाहेर उभे असल्याचा पुरावा म्हणून सोशल मीडियावर एक लाईव्ह व्हिडीओही शेअर केला होता. आता त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. मी तुझी लिमिट पाहू इच्छितो, असे अभिनवने या व्हिडीओत म्हटले आहे.
तू माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. आधी तू माझ्या मुलाला मे ते सप्टेंबरपर्यंत माझ्यापासून दूर ठेवले. तो तुझ्यासोबत येऊ इच्छित नव्हतो. तेव्हा मीच त्याला समजावले आणि आता तू माझ्यासोबत काय केलेस. तू त्याला घेऊन पळून गेलीस. काल मी तुला शोधून काढले आणि तू मला त्याला एक सेकंदही पाहू दिले नाही. तू माझ्यासोबत आणखी किती वाईट वागणार आहेस. आता मी सुद्धा तुझी लिमिट पाहू इच्छितो, असे अभिनवने या व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अभिनवने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अभिनव श्वेताच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र श्वेता त्याला मनाई करते. मेरे घर मत आओ, असे ती त्याला म्हणते. यावर धक्का मत दो, असे अभिनव म्हणतो.
यापूर्वीच्या व्हिडीओमध्ये अभिनव कोहली वारंवार श्वेताच्या घराची बेल वाजवताना व घरात प्रवेश मिळावा यासाठी आरडाओरड करताना दिसला होता. अभिनव कोहलीने इन्स्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला होता. दरवाजा उघड...मला प्यारुला भेटू दे...हे तू का करत आहेस? माझा मुलगा घाबरला आहे. आधी ती त्याला मला भेटू द्यायची. पण आता ती त्याला भेटू देत नाहीये. माझे पोर प्रचंड घाबरले आहे. आमच्या भांडणाचा माझ्या मुलाच्या मनावर वाईट परिणाम होतोय, असे अभिनव व्हिडीओत म्हणता दिसला होता. अलीकडे श्वेता कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. अशास्थितीत तिने मुलगा रेयांशला अभिनवकडे सोडले होते. मात्र यादरम्यान अभिनवने एक नवा आरोप केला होता. 25 आॅक्टोबरला श्वेता रेयांशला घेऊन गेली आणि यानंतर आपला मुलगा गायब आहे. श्वेताने त्याला अज्ञातस्थळी लपवल्याचे अभिनवने म्हटले होते. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात श्वेता तिवारीने अभिनव कोहलीविरोधीत कौटुंबिक हिसाचाराची तक्रार केली होती.
पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार
अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहली विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तर, श्वेता निघून गेल्यावर काही वेळातच तिचा पती अभिनेता अभिनव कोहली देखील समता नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. श्वेता आणि अभिनवला 4 वर्षांचा मुलगा असून, त्याचा सांभाळ करण्यावरून पती-पत्नीमध्ये खडाजंगी सुरू आहे. श्वेता आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचे म्हणत, अभिनवने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने मुलाची कस्टडी आपल्याकडे देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
श्वेताचे हे दुसरे लग्न आहे. याआधी अभिनेता राजा चौधरीसोबत तिचे लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून श्वेताला पलक नावाची एक मुलगी आहे. यानंतर श्वेताच्या आयुष्यात अभिनव कोहलीची एन्ट्री झाली. दोघांना रेयांश नावाचा मुलगाही झाला. मात्र त्यानंतर त्यांच्या संसारात कुरबुरी सुरू झाल्या. ऑगस्ट महिन्यात श्वेताने अभिनवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. अभिनवने मुलगी पलकवर हात उचलल्याचा आणि तिच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप श्वेताकडून करण्यात आला होता. अभिनवने अर्थातच हे आरोप फेटाळून लावले होते. श्वेता तिवारी बिग बॉसमध्ये होती तेव्हा आपणच पलकचा सांभाळ करत होतो. श्वेता तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकणार होती. पण मी तिला थांबवल्याचे त्याने म्हटले होते.
2001 मध्ये 'कसौटी जिंदगी की' या मालिकेने श्वेताला खरी ओळख दिली. या मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका साकारली होती. 2004 मध्ये बॉलिवूडमध्येही तिने पदार्पण केले. त्यावर्षी बिपाशा बासू स्टारर 'मदहोशी' हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा. यानंतर आबरा का डाबरा, मिले ना मिले हम या चित्रपटांतही ती झळकली. याशिवाय अनेक भोजपुरी सिनेमांतही तिने काम केले.
SEE PICS : श्वेता तिवारीच्या घरातील वाद चव्हाट्यावर; पती अभिनवचा धिंगाणा, शेअर केला व्हिडीओ