Join us

"अशोक मामा...तुझ्या आयुष्याची कहाणी...", पुरस्कार सोहळ्यातील 'तो' क्षण; सिद्धार्थ जाधवची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:30 AM

"माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य..." सिद्धार्थ जाधव झाला भावूक

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) स्टेजवर परफॉर्मन्स देत अशोक मामांना ट्रिब्युट दिलं. इतकंच नाही तर परफॉर्मन्स संपल्यानंतर त्याने अशोक मामांच्या गळ्यात फुलांची माळ घालत साष्टांग दंडवतही घातले. हा क्षण खरोखरच सर्व रसिकप्रेक्षकांना भावूक करणारा होता. 

दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवने काही वेळापूर्वीच अशोक सराफ यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो, 'अशोक सराफ...  अशोक मामा...  माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि  त्यांची मूर्ती मनात बसवून  काम करू पाहणारे आम्ही एकलव्य.... त्याच्या पायाशी कधी बसायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण आयुष्यातला हा खूप  मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली ...आणि अशोक मामांना ती मनापासून आवडली.. भारावल्या डोळ्यांनी त्यांनी कौतुक केलं.. आशिर्वाद दिले... मामांना जीवन गौरव मिळाला हे आहेच पण त्यांच्यासमोर असा परफॉर्मन्स  करून माझ्या जीवनाचं  सार्थक झालं....     हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहील .... 

सिद्धार्थची ही पोस्ट म्हणजे सर्वच कलाकारांच्या मनातील भावना आहे. अशोक मामांनी सिनेसृष्टीसाठी दिलेलं योगदान शब्दात मांडता येणारं नाही.  'अशी ही बनवाबनवी', 'साडे माडे तीन', 'धुमधडाका' यासारख्या अनेक सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावंकर यांच्यासोबत त्यांचे चित्रपट खूप गाजले. त्यांच्यातील मैत्रीही घट्ट आहे. आज लक्ष्याची सर्वांनाच आठवण येत असणार हे नक्की.

टॅग्स :अशोक सराफसिद्धार्थ जाधवसोशल मीडिया