अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) मृत्यूनंतर त्याचा जिम ट्रेनर सोनू चौरसियाने केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिद्धार्थ मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊच शकत नाही, असा दावा या जिम ट्रेनरने केला आहे.‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू चौरसियाने काही धक्कादायक खुलासे केलेत. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, हे मी मानूच शकत नाही. तो खूप फिट आणि फिटनेसबद्दल अतिशय जागरूक होता. रोज सकाळी 10.30 वाजता तो जिममध्ये असायचा. जिममध्येही तो खूप घाम गाळायचा. खूप मेहनत करायचा, असे सोनू म्हणाला.
सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा माझ्यासाठी तो मोठा धक्का होता, असेही तो म्हणाला. ‘सकाळी 9.30 वाजता मला राहुल वैद्यचा फोन आला. सिद्धार्थची तब्येत बिघडल्याचे त्याने मला सांगितले. पण यानंतर थोड्याच वेळात माझा फोन खणखणू लागला.
सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी माझ्यासाठी मोठा धक्का होती. तो कधीच कुठल्या तणावात वा डिप्रेशनमध्ये नव्हता. नेहमी आनंदी राहणारा आणि सर्वांना आनंदी ठेवणारा माणूस होता. 24 ऑगस्टला मी त्याच्याशी बोललो होतो. त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नंतर मी मुंबईत नव्हतो. 20 ऑगस्टला त्याने बहिणीला गाडी गिफ्ट करणार असल्याचे मला सांगितले होते आणि 22 ऑगस्टला गाडी गिफ्टही केली होती. सिद्धार्थ रात्री जेवल्यानंतरही 40 मिनिटं वॉक करायचा. मला सुद्धा त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. त्याचा मृत्यू हार्टअटॅकने झाला, यावर अजूनही माझा विश्वास नाहीये,’असेही त्याने सांगितले.