अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla ) गुरूवारी सकाळी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. खरंतर सिद्धार्थसारख्या इतक्या फिट अभिनेत्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू व्हावा, यावर कोणाचाच विश्वास बसेना. आत्ता सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. मात्र या रिपोर्टमध्ये सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद केलेलं नाही.
डॉक्टरांनी सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Sidharth Shukla Post-Mortem Report )पोलिसांना सोपवलेला आहे. तथापि या रिपोर्टमध्ये ना सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण नमूद आहे, ना डॉक्टरांनी स्वत:चं मत नमूद केलं आहे. त्याचा व्हिसेरा प्रिझर्व्ह करून ठेवण्यात आला आहे. अभिनेत्याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीनंतरच स्पष्ट होणार आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं म्हटलं होतं. मात्र रिपोर्टमध्ये आणखी केमिकल अॅनालिसीसची गरज स्पष्ट करण्यात आली आहे. केमिकल अॅनालिसीसनंतरच सिद्धार्थच्या शरीरात कोणतं विष तर नव्हतं, हे समोर येईल. शिवाय त्याला कोणता आजार तर नव्हता, हे देखील स्पष्ट होईल.
सिद्धार्थच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शरीरावर कोणत्याही जखमेचे निशाण आढळून आलेले नाही. अंतर्गत जखमेचाही उल्लेख नाही.पाच डॉक्टरांच्या टीमने सिद्धार्थच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. याची व्हिडीओग्राफी करण्यात आली. सिद्धार्थ मानसिक तणावाखाली होता, याचा त्याच्या कुटुंबीयांनी इन्कार केला आहे. आज सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.