Join us

रिया आणि मिष्टीमध्ये आहे 'हे' साम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 8:30 PM

स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध यावर भाष्य करते. या मालिकेतून पुरोगामी विचार मांडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमिष्टी ही अबोल स्वभावाची असली, तरी ती बुध्दिमान तरुणी आहे

स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध यावर भाष्य करते. या मालिकेतून पुरोगामी विचार मांडण्यात आले आहेत. या मालिकेची कथा आपल्या जीवनसाथीची निवड विचारपूर्वक घेण्यावर आधारीत आहे. आता ही संकल्पना आणखी एक पाऊल पुढे नेताना मालिकेच्या निर्मात्यांनी विवाहपूर्व मैत्रीच्या संबंधांच्या विषयाला स्पर्श केला आहे. या मालिकेत मिष्टी या नायिकेची मध्यवर्ती भूमिका रंगविणारी अभिनेत्री रिया शर्मा हिचे विचारही त्यातील मूळ संकल्पनेशी जुळणारे आहेत.

रिया शर्मा सांगते, “मिष्टी ही अबोल स्वभावाची असली, तरी ती बुध्दिमान तरुणी आहे. ती फारशी बोलत नसली, तरी ती तिची मतं ठामपणे व्यक्त करते आणि ती तशी हट्टी स्वभावाची असते. ज्याच्याबरोबर लग्न करायचं, त्याच्यावर ती पटकन विश्वास टाकू शकत नाही आणि तिच्या जात्याच सावध स्वभावामुळे कुणालशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे विचार आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी ती काही काळाचा अवधी मागते. ती आजच्या पिढीच्या तरुणीची प्रतिनिधी असली, तरी प्रेक्षकांना तिचे विचार सहज मान्य होण्यासारखे आहेत. आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये कुणालबरोबर ती नातं प्रस्थापित करताना दिसेल आणि एक व्यक्ती म्हणून तो कसा आहे, ते जाणून घेण्याचा ती प्रयत्न करील. पण आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची तिला कल्पना नसते.”

मिष्टीची व्यक्तिरेखा अचूकपणे उभी करण्यासाठी अतिशय मेहनत घेणाऱ्या रियाचे वैयक्तिक जीवनातील विचारही मिष्टीसारखेच आहेत. आता मालिकेच्या कथानकाला मिळणाऱ्या काही अनपेक्षित वळणांनी त्यातील उत्कंठा अधिकच वाढली आहे.

टॅग्स :स्टार प्लस