Join us

“करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान” उपक्रमाला महाराष्ट्र भरातून भरघोस प्रतिसाद !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 8:03 PM

"सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित "सिंधुताई सपकाळ". त्यांचा महाराष्ट्राच्या अनाथ लेकरांची माई बनण्यापर्यंतचा प्रवास हा अंगावर शहारे आणणारा, काळीज पिळवटून टाकणारा होता. कुठून आणि कसा सुरु झाला हा प्रेरणादायी प्रवास ? चिंधी अभिमान साठे पासून सिंधुताई सपकाळ कशी घडली ? हा प्रवास आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठीवर "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 आगामी मालिकेनिमित्त “करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान” हा एक विद्यादानाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रातील मुंबई, अकोला,औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या पाच शहरांमध्ये राबविण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता १० ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये सन्मती बाल निकेतन येथे करण्यात आली. सिंधुताईंच्या आशीर्वाद आणि प्रेरणेतून ज्यांचे यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडलं, इतकंच नव्हे तर सिंधुताईंच्या समाजकार्याचा वारसा जे अजूनही यशस्वीपणे  पुढे चालवत आहेत  अश्या व्यक्तींचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्यामध्ये ममता सिंधुताई सपकाळ, श्री. दीपकदादा गायकवाड, श्री. अरुणभाऊ सपकाळ, श्री. विनय सिंधुताई सपकाळ, श्री. मनिष बोपटे, श्रीमती. स्मिता पानसरे, कु. सरोज जांगरा, डॉ. माधवी साळुंखे, मनिषा नाईक, श्री. यश सूर्यवंशी यांचे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेस कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड विराज राजे देखील उपस्थित होते.

 अनाथ लेकरांची आई पद्मश्री "सिंधुताई सपकाळ" यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून निराधार मुलांच्या शिक्षणासाठी शालेय पाठयपुस्तकं, - कथा कविता, बालपुस्तकं, कादंबरी, प्रेरणादायी आत्मचरित्रात्मक कथेची पुस्तकं जमवण्याचा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. उपक्रमातुन जमवलेली पुस्तकं 'सिंधुताई सपकाळ' यांच्या आश्रमाला दान करण्यासाठी 'कलर्स मराठी' ने  हा उपक्रम आयोजित केला.

टॅग्स :सिंधुताई सपकाळ