छोट्या पडद्यावर 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका रसिकांची मनं जिंकत आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेत राणूबाई ही भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महंगडे हिचंही रसिकांकडून विशेष कौतुक होत आहे. कोणतीही भूमिका सहजरित्या साकारताना ती पाहायला मिळते. या भूमिकेआधी तिने अस्मिता या मालिकेतही काम केले आहे. या मालिकेतील तिची मनाली ही भूमिका विशेष लक्षणीय ठरली. याशिवाय लक्ष्य, ब्रह्मांडनायक, भेटी लागे जीवा, सावर रे, लक्ष्य या मालिकांमध्येही तिने काम केले आहे. बॉईज, उणीव अशा सिनेमांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. आता अश्विनीने एक वेगळं काम करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना जागृत करण्यासाठी तिने आता एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे . मासिक पाळीच्या संबंधित समस्यांबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी ती एक वेबसिरीज बनवत आहे. 'माहवारी' असं या वेबसिरीजचं नाव आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून ती निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून समोर येत आहे. या वेबसिरीजचे काही भाग तिने आपल्या गावात म्हणजे सातारा जिल्ह्यातील पसरणी या गावातच शूट केले असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर याचे भाग रसिकांना पाहायला मिळत आहे. केवळ पैसा मिळावा म्हणून नव्हे तर आपले मत व्यक्त करता यावे यासाठी अश्विनीने या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. त्यामुळे तिच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. नुकताच तिला "कोरी पाटी"या युट्यूब चॅनेल यांच्या 'गावाकडच्या गोष्टी' तर्फे “प्रेरणा पुरस्कार” देण्यात आला आहे तिच्या या नवीन वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!!….
छोट्या पडद्यावर आजवर विविध ऐतिहासिक महापुरुषांच्या गाथा मालिका रुपात रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. यांत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, चक्रवर्ती सम्राट अशोक, गौतम बुद्ध, झाशीची राणी लक्ष्मीबाई, टीपू सुल्तान, महाराजा रणजित सिंग, महाराणा प्रताप अशा अनेक ऐतिहासिक थोर महापुरुषांच्या गाथा मालिका रुपात रसिकांच्या भेटीला आल्या. या महापुरुषांचं बालपण, त्यांची शौर्यगाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउतार या मालिकेतून दाखवण्यात आले. या मालिकांना रसिकांचंही भरभरुन प्रेम मिळाला होता. त्याचप्रमाणे इतर मालिकांप्रमाणे 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेला खूप पसंती मिळत आहे.