छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'क्योंकी सास भी कभी बहू थी'. या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर आजही या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत येतात. सध्या या मालिकेच्या सेटवरील एक किस्सा चर्चिला जात आहे. एकदा सेटवरील जेवणात चक्क झुरळ आढळून आलं होतं. या घटनेनंतर मालिकेतील कलाकारांमध्ये संतापाची लाट पसरली होती. हा किस्सा केंद्रीय मंत्री, अभिनेत्री स्मृती इराणी (smriti irani) यांनी सांगितला आहे.
अलिकडेच स्मृती इराणी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 'क्योंकी सास भी कभी बहू थी'च्या सेटवर घडलेल्या किळसवाण्या प्रकाराविषयी भाष्य केलं.
"एकदा सेटवर आम्ही जेवत असताना एका टेक्निशिअनच्या जेवणात चक्क झुरळ आढळलं. हा किळसवाणा प्रकार पाहिल्यानंतर मी याविषयी तक्रार करायला निघाले. पण, आम्हाला जेवण देणारा कॅटरर्स हा खूप मोठा व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांची तक्रार करू नकोस असं म्हणत त्या टेक्निशिअनने मला अडवलं. परंतु, मी त्याला न जुमानता सेटवर माझा संताप व्यक्त केला आणि याविषयी नाराजी व्यक्त केली," असं स्मृती इराणी म्हणाल्या.
पुढे त्या सांगतात, "ज्या कॅटरर्स कडून कलाकारांना जेवण मागवलं जातं त्यांच्याकडूनच इतर सहकाऱ्यांसाठी जेवण आलं पाहिजे अशी मी मागणी केली. जर सेटवरच्या प्रत्येकाला सारखं जेवण मिळालं नाही तर मी उद्यापासून काम बंद करेन असं थेट सांगितलं. त्यानंतर मग सेटवरच्या प्रत्येकाला सारखं जेवण मिळायला लागलं." दरम्यान, या मालिकेनंतर त्यांनी बंगाली सिनेमांमध्येही काम केलं. सध्या त्यांचा राजकारणात सक्रीय सहभाग आहे.