Join us

Apurva Nemalekar :...म्हणून सोडली शेवंताची भूमिका, गंभीर आरोप करत अपूर्वा नेमळेकरचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 9:33 PM

Ratris Khel Chale 3: रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या हंगामात अभिनेत्री Apurva Nemalekar हिने साकारलेले शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मालिकेच्या तिसऱ्या हंगामातही ही भूमिका अपूर्वा साकारत होती. मात्र अपूर्वाने अचानक मालिका सोडल्याने प्रेक्षकांना आणि शेवंताच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

मुंबई - पहिल्या दोन हंगामामध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा हंगाम सध्या सुरू आहे. मालिकेच्या दुसऱ्या हंगामात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेले शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मालिकेच्या तिसऱ्या हंगामातही ही भूमिका अपूर्वा साकारत होती. मात्र अपूर्वाने अचानक मालिका सोडल्याने प्रेक्षकांना आणि शेवंताच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिने ही मालिका का सोडली अशी विचारणा होत होती. दरम्यान, आता अपूर्वा नेमळेकर हिने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप करत मालिका सोडण्याची कारणे सांगितली आहेत.

या पोस्टमध्ये अपूर्वा नेमळेकर म्हणाली की, शेवंता, बस नाम ही काफी है, पर कभी कभी ये इतनाही काफी नही हौता. शेवंता म्हणून आपली एक ओळख आणि नंतर जिव्हाळ्याचे नाते अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका करताना मला मजा आली, तसेच समाधानही वाटले. प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली. मात्र असे सारे काही छान घडत असताना मी ही भूमिका का सोडली. मला असा प्रतिकूल निर्णय का घ्यावा लागला, अशी विचारणा केली जात आहे. त्याल उत्तर देणं माझं कर्तव्य म्हणून मी हा खुलासा करत आहे.

शेवंता या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कमेंट आल्या. त्यांचा मी फेस केल्या परंतु आता सेटवर काम करत असताना अगदी नवख्या आणि आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी या वाढलेल्या वजनावरून विनाकारण माझे विडंबन केले. माझी उघडपणे खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स ह्या जाणीवपूर्वक मला जिव्हारी लागतील अशा केल्या गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही नवख्या कलाकारांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही, असा आरोप अपूर्वाने या पोस्टमधून केला आहे.

रात्रीस खेळ चालेचं शूटिंग सावंतवाडीमध्ये सुरू आहे. मी त्यासाठी मुंबईवरून १२ तास प्रवास करून जात असे. मला बोलावल्यानंतर एक दिवस चित्रिकरण करून नंतर तीन-चार दिवस काहीच चित्रिकरण केलं जात नव्हतं. महिन्याभरात असं केवळ सहा ते सात दिवस काम असे. मात्र त्यासाठी मला वारंवार प्रवास करावा लागत असे. त्या माझा वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात असे, असे अपूर्वाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या हंगामासाठी तुमचे पाच ते सहा दिवसच लागतील, असे प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आले होते. म्हणून मी सुरुवातीला नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एक मालिका देण्याचं आश्वासन दिलं गेलं. मात्र पाच-सहा महिन्यांनंतरही ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे माझं आर्थिक नुकसान होत आहे, असा दावा अपूर्वाने केला. असाच प्रकार गेल्या वर्षीसुद्धा  झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेच्या वेळी घडला होता. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही. त्यावर चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही, असं आश्वासन दिलं गेलं. मात्र अद्याप तो चेक मिळाला नाही.  मी प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठा राहून काम केलं. मात्र माझ्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल.  माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना होत असेल, नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल. तर अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या मालिकेत न राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर  माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंतामधून मला बाहेर पडावे लागले. मात्र तो माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथेच थांबत नाही.  आणखी काही नव्या भूमिका मिळतील. त्या मी करत राहीन, आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील, अशी मी आशा करते हीच माझी एकमेव प्रेरणा आहे, असे अपूर्वा नेमळेकरने आपल्या दीर्घ फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चाले ३झी मराठीमराठी