Join us

​या कलाकारांनी दिला सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 4:24 PM

नोटाबदलाच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला चांगलाच धक्का बसला आहे. 500-1000च्या नोटा बदलण्यासाठी लोक कित्येक तास बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये रांगा लावत ...

नोटाबदलाच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला चांगलाच धक्का बसला आहे. 500-1000च्या नोटा बदलण्यासाठी लोक कित्येक तास बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये रांगा लावत आहेत. अशिक्षित लोकांना तर नोट बदलायच्या म्हणजे काय करायचे हेच कळत नाहीये. त्यामुळे या लोकांना मदत करण्यासाठी काही कलाकार पुढे आले आहेत. नकुशी...तरी हवीहवीशी या मालिकेत प्रमुख मालिका साकारणारी प्रसिद्धी आयलवार आणि राधाची भूमिका साकारणारी रुपल नंद यांनी मुंबईतील काही भाजी विक्रेत्यांना भेटून त्यांना नोटा कशाप्रकारे बदलायच्या याबाबत मार्गदर्शन दिले. नोटा कुठे बदलल्या जातात, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तसेच त्यासाठी लागणारा फॉर्म कुठे मिळतो, तो कसा भरायचा याची माहिती त्यांना दिली. याविषयी प्रसिद्धी आयलवार सांगते, "आम्ही मुंबईतील काही भाजीविक्रेत्यांना जाऊन भेटलो. खरे तर तळागाळातल्या लोकांना नोटाबदलाबद्दल सगळी माहिती नाहीये. नोटा रद्द झाल्या म्हणजे नेमके काय झाले आहे, नोटा बदलायच्या म्हणजे काय, नोटा बदलल्यावर त्यांना त्याच्या बदल्यात किती पैसे मिळणार याविषयी माहिती त्यांना नव्हती. त्यांना आम्ही या गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगितल्या. नोटा बदलण्यासाठी कोणाच्याही प्रलोभनांना फसू नका, नोटा केवळ बँकेत अथवा पोस्टात जाऊनच बदला. तसेच तुम्ही जितके पैसे देणार तितकेच पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. तुम्हाला नोटा बदलल्यानंतर कमी पैसे मिळतील असे कोणी सांगितले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे असेही सांगितले. त्यांनीदेखील आमचे बोलणे शांतपणे एेकून घेतले आणि आम्ही दिलेल्या माहितीसाठी आमचे सगळ्यांचे आभार मानले."